नगर तालुका | १ जून | प्रतिनिधी
(Environment) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यातील इसळक येथे ग्रामीण भागातील पहिल्या पर्यावरण परिषदेचे आयोजन आत्मनिर्धार फाउंडेशन संचलित पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन जागतिक कीर्तीच्या पर्यावरण तज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी दिली.
या परिषदेत ‘वॉटरमॅन’ अशी ओळख प्राप्त झालेले पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी सचिन कंद आदी मार्गदर्शन करणार आहेत.

(Environment) सध्या वातावरणात होत असलेले बदल आणि त्यामुळे येणारी अस्मानी संकटं, तापमान वाढ, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यावरील उपाययोजना आदी मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती ॲड. राहुल ठाणगे यांनी दिली.
(Environment) पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने अमित गायकवाड, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, डॉ. प्राजक्ता ठुबे, डॉ. नागेश शेळके, सचिन मोहन चोभे, हभप सिद्धनाथ मेटे, किसन आटोळे, भैरवनाथ वाकळे, संदीप जाधव, संतोष घोलप आदींसह जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

(Environment) जागतिक पर्यावरणदिनी गुरुवारी, ता. ५ जून रोजी सकाळी ९.३० वा. श्री. क्षेत्र लिंगतिर्थ इसळक येथे पर्यावरण परिषदचे उद्घाटन डॉ. कर्वे यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सत्रानंतर, जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींचे चर्चासत्र पार पडणार आहे. या परिषदेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आत्मनिर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी केले.
परिषदेच्या यशस्वितेसाठी रामदास कोतकर, सुनील जाजगे, संदीप गेरंगे यांच्यासह पर्यावरण संवर्धन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
