Education | वर्गातील उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यापीठ सरसावले; कृती आराखडा सादर करण्याचे सक्त निर्देश

नांदेड | १८.२ | रयत समाचार

 

महाविद्यालयांतील घटती विद्यार्थी वर्गउपस्थिती लक्षात घेऊन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ (Swami Ramanand Teerth Marathwada University) यांनी संलग्न महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थी विकास विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात संबंधित संस्थांना तातडीने कृती आराखडा आखण्यास सांगण्यात आले आहे.

 

विद्यापीठाच्या स्तरावर झालेल्या आढाव्यात काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केवळ नियमांची अंमलबजावणी न करता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

 

महाविद्यालयांना रोजगाराभिमुख आणि कौशल्यविकास कार्यक्रमांचे आयोजन. विद्यार्थी- पालक- शिक्षक संवाद वाढविणे

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रे. नाविन्यपूर्ण आणि उपक्रमाधारित अध्यापन पद्धती

विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, या बाबींवर विशेष भर देण्याचे सुचविण्यात आले आहे.

 

विद्यापीठातील सुत्रांनी सांगितले की, उपस्थिती ही केवळ शिस्तीचा मुद्दा नसून शैक्षणिक गुणवत्तेशी निगडित बाब आहे. नियमित वर्गात सहभाग वाढल्यास निकालात सुधारणा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो.

 

शिक्षणतज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमागे अर्धवेळ नोकरी, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि पारंपरिक अध्यापनातील मर्यादा अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे संस्थांनी डिजिटल उपस्थिती नोंद प्रणाली. उत्कृष्ट उपस्थितीसाठी प्रोत्साहन योजना. उद्योगसंलग्न प्रशिक्षण आणि इंटर्नशिप. माजी विद्यार्थ्यांशी संवाद सत्रे, अभिप्रायाधारित अध्यापन सुधारणा या पूरक उपायांचाही विचार करावा असे सुचविले.

 

विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना राबविलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, या उपक्रमाचा परिणाम पुढील शैक्षणिक सत्रात दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थिती वाढविण्याचा हा प्रयत्न शैक्षणिक शिस्तीबरोबरच अध्यापनातील गुणवत्ता आणि उत्तरदायित्व अधोरेखित करणारा ठरत आहे.

Share This Article