समाजसंवाद | २९ जून | सुरेश खोपडे
(Cultural Politics) शिवसेना, कोल्ह्यांच्या कळपाने उद्ध्वस्त केलेली एक सिंहांची संघटना. सिंहासारख्या आक्रमक आदरणीय बाळ ठाकरे यांची शिवसेना मागे वळून पाहताना कशी दिसते?
उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र येऊन ती कुठे घेऊन जाणार? अगर जातील?
(Cultural Politics) त्याकाळी “शिवसेना जिंदाबाद” अशी घोषणा दिली की, आम्हा तरुणांची छाती भरून येत असे. आम्हा स्थानिकांच्या नोकऱ्या बळकावणाऱ्या मद्रास्यांचा आम्हाला राग होता. “उठाव लुंगी, बजाव पुंगी” म्हटलं की, आम्हाला मजा वाटत असे. ‘लांड्यांना, पाकड्यांना धडा शिकवू, गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेने आमच्या धर्म व राष्ट्रप्रेमाला खत-पाणी घातले जाई. सैतान चौकी, सयानी रोड, परळ या कामगारवस्तीत काही काळ राहिल्याने एका बाजूला गिरणीमालकांची मोठी घरं व दुसऱ्या बाजूला कामगारांच्या चाळी बघून कसंनुस वाटे. या सगळ्यांना सरळ करण्यासाठी बाळ ठाकरे नावाचा माणूस सिंहासारखा वाटे.
(Cultural Politics) १९७०, साली भिवंडीत घडलेल्या भयानक दंगलीबद्दल आरएसएसच्या लोकांबरोबर बाळासाहेब ठाकरे यांना जस्टीस मादन कमिशन चौकशी अहवालात दुषणे देण्यात आली होती. १९८४ दंगलीमध्ये तसाच दोष देण्यात आलेला होता. अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लालकृष्ण आडवाणी, नरेंद्रजी मोदी यासह सर्वांनी कोर्टापुढे शेपूट घातले, पण एकटे बाळासाहेब म्हटले की, ‘मशिद उध्वस्त करण्यासाठी भाग घेणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.’ 93 १९९२-९३ मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या श्रीकृष्ण कमिशनने देखील बाळ ठाकरे व शिवसेनेला दोष दिलेला होता. जनसंघ भाजप नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळ ठाकरे आम्हा हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट बनले.
लोकशाही ऐवजी ठोकशाहीची भाषा करणाऱ्या बाळासाहेब यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला. तो हिंदू मुख्यमंत्री एवढा पावरफुल होता की, त्याने आमच्या गणरायाला दूध प्यायला भाग पाडले! आणि युती नावाचे एक राजकीय मॉडेल महाराष्ट्राला दिले. छत्रपती शिवराय, सीमाप्रश्न, हुतात्म्यांच बलिदान, मुंबई गुजरातला देणार नाही, मराठी अस्मिता असा नारा देणाऱ्या बाळासाहेबांनी एके दिवशी आपल्या मुलाला व नातवाला स्टेजवर उभे केले. भरसभेत जनतेला लोटांगण घातले आणि ‘उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा ‘अशी विनवणी महाराष्ट्र जनतेपुढे केली. करोडो शिवसैनिक असताना त्यांना आपल्या कुटुंबाची काळजी का वाटली? त्यामागे लोकशाही, ठोकशाही, घराणेशाही, की मानव उत्क्रांतीमधील टोळीशाही होती, याचा यथावकाश शोध घेऊया.
मराठासह बहुजनातील प्रस्थापितांनी राजकीय सत्ता आपल्या घरात डांबून ठेवल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्यातील रिक्षावाला, पानटपरीवाला, कुक्कुटपालनवाला, भाजीपाला विक्रेता अशा महत्वकांक्षी तरुणांना हाताशी धरले. हिंदूधर्म न समजता ते कडवे हिंदुत्ववादी बनले.
बाळासाहेबांच्या नंतर याच शिवसैनिकांनी त्यांच्या घरातून पक्ष, धनुष्यबाण, त्यांचा फोटो पळवून नेला. हे असे का घडले? हे समजून घेण्यासाठी राजकीय विचारवंत ‘निकोलाव मॅकीवेली’ यांनी मांडलेले विचार लक्षात घेवू या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळ ठाकरे हे यशस्वी कसे झाले याचे उत्तर त्यांच्या ‘द प्रिन्स’ या पुस्तकात सापडेल. “राजपुत्रांनो, तुम्हाला सत्ता हवी असेल तर तुम्ही प्रामाणिक, दानशूर, धार्मिक, दयाळू, प्रेमळ, विद्वत्तापूर्ण असले पाहिजे. पण एका माणसामध्ये हे सर्व सद्गुण असणे शक्य नाही. तरीपण तुम्ही ढोंग करा की तुमच्यामध्ये हे सर्व गुण आहेत. राजपुत्रांनो, तरीही हे सर्व मानवीगुण सत्ता मिळविण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी तुम्हाला काही प्राण्यांचे गुण घ्यावे लागतील. तुमच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुम्हाला सिंहासारखे क्रूर बनावे लागेल.”
आदरणीय बाळासाहेब ठाकरे सिंहासारखे आक्रमक वागल्याचे दिसून येते. तो पुढे म्हणतो, ”सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी सिंहासारखे क्रूर बनणे एवढेच पुरेशी नाही. सिंहाला विरोधकाने लावलेले सापळे ओळखता येत नाहीत आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला कोल्ह्यासारखे धूर्त बनाव लागेल.”
बाळासाहेब आणि त्यानंतरची पिढी हे सापळे ओळखण्यात अपयशी ठरलेली तर नाही ना? हो. ते त्यांना ओळखता आले नाही! एकेकाळी प्रमोद महाजनसारखे आर्य ब्राह्मण धूर्त राजकारणी मातोश्रीवर बाळासाहेबांच्या पायाशी बसून चर्चा करत. तर त्यांचीच परंपरा चालविणाऱ्या देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने बहुरुप्याचे सोंग घेत याच शिवसेनेच्या स्वार्थी, शिवसैनिकांना हाताशी धरून शिवसेना फोडली, पक्ष चिन्ह, पक्षाचा ध्वज आणि बाप ही पळविला.
हे सगळे शिवसैनिक मावळे एका धूर्त आणि तेवढ्याच लबाड कावेबाज कोल्ह्याने फितविले. आपल्या बाजूला नेले.
‘ठाकरे ब्रँड’ कायम ठेवण्यासाठी सरसावलेल्या उद्धवजी व राजसाहेब या दोघा बंधूंना या कोल्ह्यांच्या आणि त्याच्या बिरादरीच्या करामत माहित आहेत. पण अशा करामती कश्या छेदायच्या याची माहिती आहे का? आणि ती माहिती वापरायची हिम्मत त्यांच्यामध्ये आहे का ?
‘ठाकरे ब्रँड’ची आजची ताकद असलेल्या बाबी कोणत्या? बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे निर्माण झालेली मराठी अस्मिता, रांगड्या शिवसैनिकांची मनगटे, खल्लम खट्याळ करत रस्त्यावर उतरण्यासाठी शिस्तबद्ध फौज. पण आधुनिक प्रशासन एवढ्यावर चालवता येणार नाही व त्याला पुढील दिशाही देता येणार नाही.
खरेतर “आम्हाला जानवे शेंडीचे हिंदुत्व मान्य नाही” असे जाहीर केल्याबरोबर आम्ही उद्धव साहेबांचे चाहते बनलो. आजही त्यांनी जाहीर केलेले ‘हिंदुत्व हे जानव्या शेंडी शिवाय नवीन पद्धतीने’ उभे कसे करायचे याचे कौशल्य त्यांचेकडे कितपत आहे हा प्रश्न उरतोच.
ठाकरे ब्रँडसाठी जानवे व शेंडी विरहित हिंदुत्व येणार असेल तर आमच्यासारखे अनेक लोक त्यांच्या मदतीला जायला तयार आहोत. सत्तेवर आल्यावर प्रशासन चालवताना कोल्ह्यांचा कावा कसा ओळखायचा व कोल्ह्याला त्याची जागा कशी दाखवायची याबद्दल आम्ही सांगू शकू. कसे ते बोलू या सवडीने.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

