Cultural Politics | राष्ट्रवादीचा वर्धापनदिन की ओबीसी, भटके-विमुक्तांसाठी काळा दिवस? – लक्ष्मण हाके

निधी कपात, बुलडोझर कारवाई आणि जातीवादी धोरणांमुळे असंतोष

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

समाजाच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यांवर घाला

पुणे | १० जून | प्रतिनिधी

(Cultural Politics) १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मात्र, हा दिवस राज्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर समाजासाठी काळा दिवस ठरत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पक्षावर ‘नाव राष्ट्रवादी, पण काम जातीवादी’ असल्याची टीका त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत मांडली.

(Cultural Politics) अधिक माहिती देताना हाके म्हणाले, १९९९ साली कॉंग्रेसमधून बंड करून शरद पवारांनी नवा पक्ष काढला. त्या सुरुवातीच्या काळात सोबत उभं राहणाऱ्या शिवाजी बापू शेंडगे यांचेच राजकारण पवारांनी संपवलं, असा आरोप करत हाके म्हणाले, “ज्यांनी संकटात साथ दिली, त्यांनाच नंतर बाजूला सारलं गेलं.” छगन भुजबळ, लक्ष्मण माने, प्रा. ढोबळे यांच्यावरही पक्षांतर्गत अन्याय झाल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

(Cultural Politics) धनगर समाजावर बुलडोझर ? : रायगड जिल्ह्यात धनगर समाजाच्या घरांवर बुलडोझर चालवण्याच्या हालचाली सुरू असून, त्याचे आदेश खुद्द पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिल्याचा दावा हाके यांनी केला. दुसरीकडे, ओबीसींसाठी आरक्षित संस्थांवरही गदा आणली जात असल्याचे ते म्हणाले. महात्मा फुले यांच्याच नावाने चालणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेच्या निधीत कपात करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या विचारांची संस्थाच कमकुवत होत असल्याची टीका त्यांनी केली.
विचारधारेचा विसंगतीचा आरोप : राष्ट्रवादी फुले-शाहू-आंबेडकरांचा उल्लेख ‘शाहू, फुले, आंबेडकर’ या क्रमाने करत असल्याकडे लक्ष वेधून, ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ नसून जातीवर आधारित मांडणी असल्याचा आरोपही त्यांनी केला. “नेहरू-चव्हाण-पवार ही विचारसाखळी ओबीसींसाठी साखळदंड ठरली आहे,” असे सांगून त्यांनी वसंतराव नाईक यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. “त्यांनीच खरी समाजघटकांची प्रगती केली, मात्र त्यांचा उल्लेखही टाळला जातो,” असा त्यांनी सवाल केला.
सामाजिक वीण उसवली गेली ? : शेवटी हाके यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले — दलित चळवळी फोडणारे, बी. के. कोकरे यांचा खात्मा, कामगार चळवळींचा ऱ्हास, शेतकरी संघटनेचे विघटन — हे सारे आरोप राष्ट्रवादीच्या दिशेने होते. “फोडा आणि राज्य करा” ही निती आता समाजाने ओळखली पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्व ओबीसी, भटके-विमुक्त, मायक्रो ओबीसी, दलित, आदिवासी समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे, परंतु समाजातील काही घटकांचा वाढता असंतोष लक्षवेधी ठरत आहे. सामाजिक न्यायाच्या वाटचालीत सत्ताधाऱ्यांनी ऐतिहासिक जबाबदारीनेच पावले टाकावी, अशी अपेक्षा.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *