पाथर्डी | ११ जुलै | प्रतिनिधी
(Cultural Politics) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या टाकळीमानुर येथील श्री भवानीमाता विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीदत्त महाराजांच्या आरतीने व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
(Cultural Politics) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सोनटक्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक पातारे उपस्थित होते. प्राचार्य सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना आपल्या जीवनातील पहिले गुरु म्हणून आई-वडिलांचे स्थान अधोरेखित केले. त्यांनी शिक्षकांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना नेहमी आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला.
(Cultural Politics) यावेळी पातारे यांनी गुरूस्तोत्राचे स्पष्टीकरण देत गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट केले. विद्यालयातील शिक्षक आव्हाड यांनी नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांची कथा सांगत गुरुनिष्ठेचे महत्त्व उलगडले. शिक्षक नरसाळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून गुरूंचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनीही आपापल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंजकर यांनी केले तर प्रा. अमोल ताठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गावडे व बहिर यांनी कार्यक्रमातील क्षण टिपले.
गुरुपौर्णिमेचा हा उत्सव विद्यार्थ्यांच्या मनावर चिरकाल स्मरणात राहील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
