ग्यानबाची मेख | १०.१० | भैरवनाथ वाकळे
(Cultural Politics) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्मिक मानववाद’ (Integral Humanism) हा विचार भारतीय जनता पक्षाचा (पूर्वीचा जनसंघ) मूलभूत तत्त्वज्ञान म्हणून ओळखला जातो. जनसंघाचे सहसंस्थापक तथा दीनदयाळ यांचे सहकारी प्रो.बलराज मधोक यांच्या आत्मवृत्तातून तो आपल्याला समजुन घेता येतो. हा विचार म्हणजे भारतीय संस्कृतीवर आधारित, मानवकेंद्रित विकास आणि सामाजिक व्यवस्था यांची एकात्मदृष्टी.
(Cultural Plitics) ‘एकात्मिक मानववाद’ म्हणजे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक अशा सर्व अंगांचा संतुलित विकास, ज्याचा केंद्रबिंदू ‘मानव’ आणि ‘भारतीय संस्कृती’ आहे. उपाध्यायांनी मांडलेला हा विचार ना भांडवलशाहीचा (Capitalism) आहे, ना साम्यवादाचा (Communism); तो दोन टोकाच्या विचारांपासून दूर, भारतीय जीवनदृष्टीवर आधारित मध्यममार्गी आणि ‘मानवी मूल्यां’वर आधारित आहे.
(Cultural Politics) माणूस फक्त आर्थिक प्राणी नाही. त्याचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही पातळ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. विकास फक्त आर्थिक नव्हे, तर सर्वांगीण असावा, असे दीनदयाळ म्हणत. समाज हा केवळ व्यक्तींचा समूह नाही; तो एक सजीव अंग आहे. प्रत्येक व्यक्ती समाजाचा अविभाज्य भाग आहे. व्यक्तीचा आणि समाजाचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे.
भारताने आपल्या परंपरेवर, संस्कृतीवर आणि स्थानिक साधनांवर आधारित विकास करावा. परकीय अनुकरण नव्हे, तर स्वदेशी विचार आणि भारतीय मूल्यांवर आधारित विकास करावा. धर्म म्हणजे फक्त पंथ नव्हे, तर कर्तव्य आणि ‘नैतिकता’. समाजव्यवस्था आणि शासन ही धर्मावर (म्हणजेच सत्य, न्याय, समत्व) आधारित असावी. समाजातील शेवटच्या, दुर्बल घटकाचा उन्नती हा खरा विकास. ‘सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांगीण प्रयत्न’ हे उद्दिष्ट असावे, असे ते म्हणत.
भांडवलशाहीने संपत्ती निर्माण केली पण विषमता वाढवली. साम्यवादाने समता आणण्याचा प्रयत्न केला, पण स्वातंत्र्य आणि आध्यात्मिकता गमावली, असे उपाध्याय मानत. आपल्याला भारतीय संस्कृतीच्या मूळात असलेला एकात्मिक मानववाद स्वीकारावा, असा त्यांचा आग्रह होता.
एकात्मिक मानववादाची भूमिका म्हणजे विकासाचा केंद्रबिंदू मानव आणि त्याची सर्वांगीण प्रगती. सजीव एकात्मिक अंग म्हणून समाज अर्थव्यवस्था स्वदेशी, ‘नैतिक’ आणि लोकाभिमुख तसेच राजकारण हे धर्मनिष्ठ, लोककल्याणकारी असावे, असा तो विचार होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मिक मानववाद हा केवळ आर्थिक वा राजकीय तत्त्वज्ञान नाही, तर तो भारतीय जीवनमूल्यांवर आधारित सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक मार्गदर्शक विचारधारा आहे. म्हणून उपाध्याय म्हणत, मनुष्य हा देवाचा अंश आहे; त्याच्या सर्वांगीण उन्नतीशिवाय समाजाचे कल्याण शक्य नाही.
आज आपण आजूबाजूला पहातो पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव घेऊन अगदी त्यांच्या ‘विचाराविरोधी काम’ केले जात आहे. ही उपाध्याय यांची जाहीर फसवणूक आहे. त्यांच्या एकात्मिक मानववादाला लावलेला चूना आहे.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या अधिक माहितीसाठी त्यांचे सहकारी आणि जनसंघाचे सहसंस्थापक प्रो. बलराज मधोक यांचे ‘मेरी जीवनयात्रा-भाग ३’ नक्की वाचा. दीनदयाळ यांच्यावर ढोंगी, दूटप्पी लोकांनी केलेला अन्याय समजून घ्या.
हा लेख लिहावा लागला कारण, पंडीत दीनदयाळ यांच्या नावाने ‘चालू’ असलेल्या व्याख्यानमालेत वैभवशाली नगर अर्बन बँकेला ‘गंडा’ घालणारी व्यक्ती प्रमुख उपस्थित म्हणून मिरवणार आहे आणि त्याच नावाच्या मंचावर वरीष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील व्याख्यान देणार आहेत. ही सामान्य नागरिकांची वैचारिक फसवणूक आहे तसेच एकात्मिक मानवतावाद देणारे पंडीत दीनदयाळ यांचीसुध्दा फसवणूक आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा ! – संजीव चांदोरकर