सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारीता, साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न
नेवासा | २३ डिसेंबर | भैरवनाथ वाकळे
(Cultural Politics) नेवासा तालुक्यातील तरवडी येथील माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारीता, साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी ता.२२ डिसेंबर रोजी करण्यात आले. यावेळी राज्यभरातून अनेक साहित्यरसिक, सत्यशोधक व प्रगतीशिल विचाराचे लोक आले होते.
(Cultural Politics) पुरस्कार वितरण भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कांगो यांच्या हस्ते झाले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आ.नरेंद्र पाटील घुले कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. यावेळी मंचावर ‘द हिंदू बिझनेस लाईन’ वृत्तपत्राचे सहसंपादक डॉ.राधेशाम जाधव, ॲड.देसाई देशमुख, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आ.पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमनाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मुकुंदराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरणापुर्वी परिक्षक प्रा.डॉ. सुधाकर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यशोधक मुकुंदराव पाटील पुरस्काराचे वेगळेपण त्यांनी यावेळी श्रोत्यांना दाखवुन दिले. पुरस्कारांचा बाजार आजुबाजूला कसा सुरू आहे हे सांगितले. यावेळी ते म्हणाले, मुकुंदराव पाटलांचा प्रागतिक विचार ज्या पुस्तकांतून येतो, त्या पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो. याचीच आज नितांत गरज आहे. आंबेडकर…आंबेडकर..म्हणण्याचीच गरज आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचीच धपरा पुढे चालविणारे मुकुंदराव पाटील असतील, आम्हाला जे काही स्वर्गासारखे सुख मिळालेले आहे आज, ते याच लोकांमुळे मिळाले आहे. कुठल्या भगवंताच्या आमच्या पूर्वजांनी अनेक प्रार्थना केल्या, अनेक नावे घेतली म्हणून मिळालेले नाही. सध्या उल्टे वारे वहात आहेत हे उल्टे वारे थांबविण्यासाठी अशा पुरस्कारांची व कार्यक्रमाची गरज आहे असे सांगुन परिक्षक प्रा.डॉ. सुधाकार शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

साहित्य पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील ‘द हिंदू बिझनेस लाईन‘चे सहसंपादक पत्रकार डॉ.राधेशाम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने तर निवृत्त प्राचार्य डॉ.अशोक काळे, नागपूर (अपहरण – कादंबरी), डॉ.संदिप राऊत, अमरावती (चरित्र – नवयुग प्रवर्तक नवनिर्माते संत गाडगेबाबा), डॉ.श्रीधर पवार, मुंबई (संशोधन – ब्लॅक पँथर), सुनिल शेलार, नाशिक (कथा – झापड), डॉ.गोविंद काळे, लातूर (समिक्षा – दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची खंडकाव्ये) यांना साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिर्डी येथील शिवाजी गोरक्षनाथ ढोकणे यांनी ‘मुकुंदराव पाटील यांचे सामाजिक व राजकीय विचार’ या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी पीएचडीसाठी सादर केलेल्या शोधग्रंथ प्रबंधाची प्रत येथील संशोधन केंद्रास भेट दिली. पुरस्कारार्थी म्हणून नागपूरचे निवृत्त प्राचार्य डॉ.अशोक काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराचे मानकरी डॉ.राधेशाम जाधव म्हणाले, आज हा पुरस्कार स्वीकारताना कॉम्रेड गोविंद पानसरे आणि हरी नरके यांची तीव्रतेने आठवण होत आहे. पत्रकारिता आणि माध्यमाबद्दलची एकत्रित भावना काय आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माध्यमांनी काय करावे आणि काय करू नये हा त्या त्या माध्यमांच्या मालकांचा आणि संपादकाचा प्रश्न आहे, असे आपण म्हणतो पण जेव्हा माध्यम शोषण व्यवस्थेचा प्रसार आणि प्रचार करायला लागतात ती मात्र गंभीर गोष्ट आहे. आपण खूप संघर्षाच्या काळात उभे आहोत, असे मला वाटते. माध्यमे ज्या पद्धतीने वैचारिक शोषणाला पाठबळ देता आहेत याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही वैचारिक शोषणाची चौकट संस्थात्मक शोषणात येते, मग ती शिक्षणसंस्था असो, माध्यमसंस्था असो की पोलीस यंत्रणात असो. या संस्थांमध्ये शोषणाचे बळकटीकरण होत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात शोषण होते आहे समजण्याचे बंद होते तेव्हा निवडणुकीचे निकाल कसे लागतात हे आपण पाहिलेल आहे. ‘संध्याकाळची वेळ आहे आणि खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडायला लागतात असे गो.पु.देशपांडे सर म्हणाले होते, तशी ती वेळ आली आहे, असे मला वाटते. डॉ.जाधव यांनी २०१७ सालची रा.स्व संघाच्या ‘नारद पुरस्कार’ नाकारल्याचा किस्सा सांगितला. माझी वैचारीक बांधिलकी जी आहे ती या संस्थेशी नाही. नारद पत्रकार वगैरे होते हे मला मान्य नाही. मुकुंदरावांच्या नावाने दिलेल्या या पुरस्काराचे मोल खूप मोठे आहे, त्यामुळे जबाबदारी म्हणून मी स्वीकारतो. सत्यशोधक विचारांशी, सत्यशोधनाशी प्रतारणा करणार नाही, त्याच्याशी अव्याभिचारी निष्ठा मी ठेवीन, एवढे आश्वासन मी तुम्हाला देतो, असे सांगुन पुरस्काराची रक्कम रूपये ५ हजार स्मृतिसमितीला परत सुपूर्द केली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ. भालचंद्र कांगो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, तुम्हां सर्वांना मुकुंदराव पाटील यांच्या या कार्यक्रमाला हजर राहणे महत्त्वाचे वाटले यावरूनच तुमची बांधीलकी माझ्या लक्षात आली, पण ही बांधिलकी फक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्ती असू नये. तर आपल्या समाजात सत्यशोधक विचार कसे पसरतील, समाजात जी काही परंपरावाद्यांची वापसी होती आहे, ती कशी रोखली जाईल याच्यासाठी आपण आता काम करण्याची गरज आहे असे मला वाटते. आम्ही परंपरावाद्यांना यशस्वी होऊ देणार नाही, हीच मुकुंदराव पाटलांना खरी आदरांजली ठरेल.
कॉ. डॉ. कांगो पुढे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना मुकुंदराव पाटील आणि त्यांची सत्यशोधक चळवळ सांगण्याची गरज नाही. बहुजनांमध्ये आज जी शिक्षित क्रांती झालेली आहे त्याचं श्रेय मुकुंदरावांना आहे. हे महाराष्ट्राच्या पहिल्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्याला माहिती होतं म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी मुकुंदराव पाटलांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे अभिनंदन केले. कॉ. गोविंद पानसरे मला सांगायचे की, १९८४ नंतर महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलेला नाही. फुले, शाहू,आंबेडकर यांचे नाव घेणे महाराष्ट्राच्या लोकांनी बंद करून टाकल आहे. ते मला सांगायचे की पुरोगामी – प्रतिगामी हे शब्द वापरू नको, कारण लोकांना प्रतिगामी म्हणजे काय माहिती नाही आणि पुरोगामी म्हणजे काय? वगैरे माहिती सांगण्यापेक्षा प्रगतिशील म्हणजे काय हे जरा परत एकदा सांगण्याची गरज आहे.
कांगो यांनी पुढे सांगितले, आता परिस्थिती बदललेली आहे. राजकारणाचा पोत इतका झपाट्याने बदललेला आहे की बाकीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे राजकारण मूल्यहीन झालंय वगैरे मी म्हणणार नाही. परंतु आपल्यापुढे आव्हान असे आहे की मागच्या २० व्या शतकामध्ये हिंदू धर्मामध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी म्हणून शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी आणि इतर सगळे तसेच अनेक डाव्या चळवळीतील आणि इतरही पुरोगामी लोक संघर्ष करत होते. आता नवीन मांडणी केली जाते की हिंदू धर्मामध्ये सुधारण्याची गरजच नाही. हजारो वर्षाचा धर्म फार महान असल्यामुळे त्याच्या परंपरा पाळणे म्हणजेच योग्य आहे आणि बहुसंख्यांकांना ते मान्य आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं. आत्ताच आपल्या राज्यघटनेची ७५ वी वर्ष साजरी करण्यासाठी पार्लमेंटमध्ये डिबेट झालं. त्यांचा मुकुंदराव पाटील, महात्मा फुले यांच्या चळवळीशी संबंध नाही, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या राज्यघटनेने सरकारवर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रूजविण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याचा उल्लेखही या चर्चेत झाला नाही. जगामध्ये व्यक्ती ही कुठल्याही जातीची, कुठल्याही धर्माची, कुठल्याही भाषेची, कुठल्याही रंगाची असो, स्त्री असो की पुरुष असो, व्यक्ती समान आहे हा संदेश भांडवलशाहीने दिलेला आहे आणि तो भारतात आल्यानंतर तो त्या त्या परिस्थितीनुसार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महापुरुषांनी केलं. त्यामध्ये महात्मा फुले, मुकुंदराव पाटलांसारखी मंडळी होती. जातीच्या विरुद्ध सामाजिक समता हा उदघोष आणि त्याच्यासाठी काही कार्य करण्याची जबाबदारी भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी चळवळ करून लोकशाही मजबूत केली पाहिजे. आपण तयार केलेल्या लोकशाहीच्याच माध्यमातून ते लोकशाही नष्ट करून आपल्यावरच पुनर्घात करण्याचा आता परंपरावादी लोक प्रयत्न करतात. म्हणजे काय केलं त्यांनी, जातीने भारतीय व्यवस्थेमध्ये अनेक छोट्या छोट्या जाती आहेत की, ज्या स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही, त्यांना निवडून येण्यासाठी एक व्यापक काहीतरी आयडेंटिटी लागते आणि ती व्यापक आयडेंटिटी धर्माच्या नावावर मिळू शकते याचं भान त्यांना आलं आणि म्हणून त्याचा भाग घेऊन त्यांनी लोकशाही लोकांना अधिकार मिळवून दिले आणि त्याच्यामधनं आपल्याला वाटलं की व्यक्तीस्वातंत्र्य, समानता ही पुढे जाईल पण त्याचाच उपयोग करून, त्या शक्तीचा उपयोग करून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, समानता ही लोकांच्या चर्चेतून नष्ट होईल अशा प्रकारची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं मला वाटतं. आज मुकुंदराव पाटलांचं स्मरण करताना आपल्यापुढे असलेले सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते कसं पेलायचं ह्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला आणि ह्याच्यासाठी एक व्यापक एकजुटीची गरज आहे. ही व्यापक एकजूट भारतीय संविधानाची जी मूलतत्त्व आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाणं आणि आधुनिक विचार घेऊन पुढे जाणं हे आपण ज्या दिवशी थांबू त्यादिवशी आपण मागे सरकायला सुरू होऊ आणि त्यामुळे मला असं वाटतं की २० व्या शतकामध्ये मानवी प्रतिष्ठा, मानवीहक्क यांना घेऊन आपण जे संघर्ष केले ते २१ व्या शतकात पुन्हा एकदा करावे लागणार आहे. त्या संघर्षासाठी तयारी करू या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील घुले म्हणाले, कांगो साहेब यांनी देशाची आणि राज्याची सगळी परिस्थिती मांडली. नवीन तरुण पिढी पुस्तकप्रेमी तर आहेतच परंतु त्यांना टीव्हीवरचं जास्त आकर्षण असतं आणि त्याचा लगेच इम्पॅक्ट हा समाजामध्ये होत असतो. माध्यमांवरती जी चर्चा होत असते त्याच्यातून समाजाचं मत बनत असतं. शाहू फुले, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधींनी जी चळवळ उभी केली आणि त्याच्या मधून प्रतिगामीतून पुरोगामीला समाजामध्ये आणलं आणि काही लोकांनी ते हायजॅक केलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन पूर्ण देशाचा आणि राज्याचा वातावरण हे बदलून टाकलं. सत्याला सत्य म्हणायचं नाही किंवा मानायचं नाही अशा ब्रेन वॉशिंग करण्याचा कार्यक्रम झाला. सध्याच्या परिस्थितित विचाराला फारसं महत्त्व न राहता प्रॅक्टिकल काम कसं होईल अशी एक मानसिकता समाजामध्ये झालेली आहे. धार्मिकतेचे आवरण लावून मतांचे ध्रुवीकरण केल जात आणि तिथं कोणाचाच काही शहाणपण चालत नाही. म्हणजे तुम्ही काय काम केले किंवा तुमचे विचार काय आहेत हे काहीच बोलायचं नाही. जिकडे सत्ता असेल तिकडं तो थांबतो आणि सत्तेसमोर कुणाचं शहाणपण चालत नाही. त्याच्यामुळे जो देशाचा पंतप्रधान जो असेल त्या पक्षात सगळेच आपोआप सामील होतात. माणसं ५० वर्ष एका विचाराने राहिली आणि समाज प्रबोधन करून समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, त्यांच्यामध्ये असणारा संयम आता नवीन पिढीमध्ये हळूहळू कमी होत चाललेला आहे. आपले शरीर हेच मंदिर आणि आपले कर्म हाच आपला देव हा साधा सोपा उपदेश संत गाडगे महाराजांनी त्यावेळेस आपल्याला केला. जो काम-कष्ट करेल, प्रयत्नवादी राहील त्याचं जग आहे हे महात्मा फुलेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. समाजाच्या विरुद्ध जाऊन हे विचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजून सांगायचं काम आपण करता आमचा आम्हाला नेहमी आपला अभिमान आहे.

कार्यक्रमास मुंबईहून आलेले कॉ.सुबोध मोरे, संतोष गायकवाड, संध्या मेढे, प्रा.डॉ.महेबुब सय्यद, प्रा.डॉ.सुधाकर शेलार, डॉ. रामराव भोंग, काशीनाथ नवले, अशोकराव मिसाळ, अनिल शेवाळे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, डॉ.अशोकराव ढगे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, बाबासाहेब घुले, मुख्याध्यापक सावता गायकवाड, कॉ.सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ.स्मिता पानसरे, संध्या लांडे, भगवानराव गायकवाड, ॲड. रविंद्र गव्हाणे, कारभारी तुपे, बाबासाहेब घुले, सचिन क्षिरसागर, बाबासाहेब नाईक, रविंद्र अभंग आदींसह शाळेचे विद्यार्थी विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.
