Crime | सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; खाजगी सावकारीविरूध्द नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी उघडावी व्यापक मोहिम

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पाथर्डी | १३ जून | प्रतिनिधी

(Crime) धायतडकवाडी येथील बाबासाहेब नामदेव धायतडक (वय ४६) या शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला) या सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीनंतरही चालू असलेल्या दमदाटी व धमक्यांमुळे धायतडक यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

 

(Crime) प्राथमिक माहितीप्रमाणे, बाबासाहेब धायतडक यांनी गाई खरेदीसाठी गर्जे यांच्याकडून दहा टक्के व्याजदराने सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी पाच लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले होते. मात्र, उर्वरित एक लाख रुपयांसाठी गर्जे सतत दबाव टाकत होते. “पाच लाख रुपये दे नाहीतर जमीन माझ्या नावावर कर” अशी धमकी देत ते धायतडक यांना त्रास देत होते. याच दरम्यान, ११ व १२ जून रोजी देखील गर्जे यांनी त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 

(Crime) या मानसिक त्रासाला कंटाळून धायतडक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून गावातील नवनाथ धायतडक यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप केली. “गर्जे मला मारणार होता, त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय” असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले होते. नवनाथ यांनी ही माहिती धायतडक यांच्या मुलाला दिली. दोघांनी शोध घेतला असता, डोंगराच्या कडेला त्यांची मोटारसायकल दिसून आली. पुढे शोध घेतल्यावर शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेले त्यांचे प्रेत आढळले. तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

या प्रकरणी धायतडक यांचा मुलगा सचिन यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी बाळासाहेब गर्जे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या दिवशीच विलास पुजारी यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याचा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी या प्रकरणाचा तपास स्वतःकडे घेतला आहे.
चिठ्ठी झाली व्हायरल: बाबासाहेब धायतडक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवरही व्हायरल झाली असून त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
या घटनेमुळे खासगी सावकारीच्या वाढत्या विळख्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ कठोर पावले उचलून जिल्ह्यातील खाजगी सावकारी बंद करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *