मुंबई | १४ जुलै | प्रतिनिधी
(Crime) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनात्मक विचारांचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा प्रत्यक्षात प्रागतिक विचारसरणीवरचाच हल्ला असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रज्यसचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे यांनी स्पष्ट केले.
(Crime) भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आरोप केला आहे की, महाराष्ट्रात भाजप महायुती सरकारच्या सहमतीने अशा प्रकारचे हल्ले घडत आहेत. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, आमदार व खासदार यांची चिथावणीखोर वक्तव्ये खुलेआम होत असताना त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री एकाच वेळी गृहमंत्रीही असूनदेखील अशा हल्ल्यांवर मौन बाळगतात, त्यामुळे हल्लेखोरांना चिथावणी मिळते, अशी भूमिका पक्षाने मांडली.
(Crime) डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी अजूनही मोकाट फिरत आहेत, अल्पसंख्याक व दलितांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवर सरकारचे दुर्लक्ष सुरूच आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात फूट पाडणाऱ्या उजव्या शक्ती अधिकच सक्रिय झाल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नमूद केले.
या हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हल्लेखोरांवर व त्यांना चिथावणी देणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.
