मुंबई | रयत समाचार
(Crime) क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी हालचालींना वेग आला आहे. नाशिक पोलिसांचे विशेष पथक मोठ्या तयारीनिशी मुंबईकडे रवाना झाले असून, कोकाटेंच्या अटकेची कारवाई कधीही होण्याची शक्यता आहे.
(Crime) मिळालेल्या माहितीनुसार, ३ वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सुमारे २० पोलिस अंमलदारांचे पथक न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट घेऊन मुंबईत दाखल झाले आहे. सध्या कोकाटे उपचार घेत असलेल्या रुग्णालयाकडे हे पथक रवाना झाले असून, तेथे डॉक्टरांकडून त्यांच्या आजाराची स्थिती, उपचारांची आवश्यकता आणि प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कोकाटे यांच्या बंधू विजय कोकाटे यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठीही पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(Crime) राजीनाम्यानंतर घडत असलेल्या या वेगवान घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पुढील काही तासांत या प्रकरणात महत्त्वाचे निर्णय आणि कारवाया होण्याची शक्यता आहे.
