पाथर्डी | १५ जुलै | प्रतिनिधी
(Crime) येथील पोलिसांनी तालुक्यातील माणिकदौंडी विभागातील चेकेवाडी येथे छापा टाकून १० किलो ७९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत दोन लाख रुपये आहे. ही कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
(Crime) गेल्या आठवड्याभरापासून पाथर्डी पोलिसांनी मावा, अवैध दारू विक्री आणि अमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहिम छेडली असून, या मोहिमेंतर्गत आज ही मोठी कारवाई पार पडली.
(Crime) पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चेकेवाडी शिवारातील भीमराज दत्तू चेके यांच्या घरी व शेतात गांजा साठवला असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, ढाकणे, पोलीस कर्मचारी नितीन दराडे, बाबासाहेब बडे, सुहास गायकवाड, इजाज सय्यद, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, अक्षय वडते, महेश रुईकर, प्रशांत केदार तसेच महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते यांचा समावेश होता. नायब तहसीलदार किशोर सानप यांनी राजपत्रित अधिकारी म्हणून सहभाग नोंदवला.
या कारवाईत घरातून ३ किलो ९५० ग्रॅम तयार गांजा (किंमत अंदाजे ₹९४,८००) आणि शेतातील ६ किलो ८४० ग्रॅम गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आवश्यक कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.
दरम्यान, पोलिसांनी मावा विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील फिरते विक्रेते आणि मराठवाड्यातून येणाऱ्या साठ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पाथर्डी पोलिसांनी केले आहे.
आरोग्य विभागानेही गांजा, मावा व अमली पदार्थांच्या सेवनामुळे वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रकरणांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नगर जिल्ह्यात व विशेषतः पाथर्डी तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण अधिक असून, तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या विळख्यात अडकत आहे. त्यामुळे पोलिस, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन संयुक्तरीत्या कारवाईसाठी सज्ज झाले आहेत.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.