कोल्हापूर | १९.३ | रयत समाचार
(Biodiversity) अहिल्यानगरचा शहरपक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंगफिशर पक्ष्याला सन्मान मिळाला असून कोल्हापूर राधानगरीमधील ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर प्रकल्पाच्या लोगोवर या पक्षाला स्थान मिळाले आहे. आता हा पक्षी मिनरल वॉटरच्या सर्व बाटल्यांवर दिमाखात मिरवणार आहे. हा योगायोग आहे. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर किंगफिशर पक्ष्याचे चित्र देण्यात आले असून, स्थानिक ओळख आणि पर्यावरणपूरक संदेश यांचा सुंदर संगम साधण्यात आला.
(Biodiversity) तात्कालिन अहमदनगरमधील निसर्ग मित्र मंडळाने व्यापक लोकसहभागातून शहरपक्षी निवडणूक घेतली होती. यामधे जिल्हाभरातून मतदान होऊन किंगफिशर हा पक्षी विजयी झाला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते ‘शहरपक्षी’ निवड जाहीर कार्यक्रमात करण्यात आली होती. हा पक्षी जिल्ह्याच्या व महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दिसावा, अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली होती. जेणे करून निसर्ग संवर्धन, संरक्षणास प्रोत्साहन मिळेल. परंतु अनेक वर्षांनतर अद्यापही या पक्षाला जिल्हा व मनपाच्या वेबसाईटवर स्थान मिळाले नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
(Biodiversity) राधानगरी तालुक्यातील गुडल परिसरात उभारलेल्या या प्रकल्पाने आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून उत्पादनालाही सुरुवात केली आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे शुद्धीकरण प्रक्रिया पार पाडून ‘दर्जेदार पिण्याचे पाणी’ ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता स्थानिक संस्कृती आणि जैवविविधतेला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाटलीवरील किंगफिशर पक्ष्याचे चित्र हे नवे रूप देत असून, ग्राहकांमध्येही याची सकारात्मक चर्चा आहे.
प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असून, ग्रामीण भागातील उद्योगवृद्धीस चालना मिळत आहे. भविष्यात ‘डेक्कन व्हॅली’ ब्रँड राज्यभर विस्तारण्याचा मानस असल्याचे प्रकल्प प्रमुखांनी सांगितले.
एकीकडे शुद्ध पिण्याचे पाणी आणि दुसरीकडे पर्यावरण जागरूकतेचा संदेश, अशा दुहेरी उद्देशाने ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर प्रकल्प सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


