कलासंवाद | १३ मे | महेंद्र एकनाथ तेरेदेसाई
(Art) तुमची एक सामाजिक भूमिका असली पाहिजे. पोलिटिकली करेक्ट असण्याचा कातडी बचाव पवित्रा तुमच्या अंगलट येण्याची शक्यता असते. समाजात तुमची ओळख असेल तर तुम्ही तुमची भूमिका व्यक्त करायलाच हवी. कलावंत असाल तर नक्कीच. कारण समाज तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पहात असतो. त्यांची अनेक स्वप्न तुम्ही रंगमंचावर किंवा पडद्यावर साकारलेली असतात.
(Art) पण असंख्य असे कलाकार असतात ज्यांच्या हे गावीच नसतं. उलट ‘राजकारण वाईट’ असा सोयीचा समज करून ते त्यापासून लांब रहातात. पण ग्रीक तत्ववेत्ता पेरीक्लिज म्हणतो तसं : ‘तुम्ही राजकारणात रस घेतला नाही तरी राजकारण काही तुमचा पिच्छा सोडत नाही.’
(Art) एका पर डे नटाच्या आयुष्यात असाच एकदा एक महामानव येतो. स्टुडिओत नाइन टु नाइन चाकरी करणारा तो नट. त्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायची संधी मिळते. नियमित रोजगार, तो ही वाढीव मेहेनतान्यावर मिळणार या माफक अपेक्षेने तो ती संधी स्वीकारतो. आणि त्याच्या आयुष्यात जणू एक वादळच येतं. तो, त्याचं आयुष्य कसं पूर्णतः बदलतं. हेच नाटक आहे, ‘भूमिका’. क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित.
आपल्यातच मश्गुल असलेले कलावंत, प्रेक्षकांना मायबाप ठरवून, फक्त त्यांची करमणूक करण्यात धन्यता मानतात. त्यालाच सामाजिक कार्य समजून स्वतःची तुमडी भरत राहतात. अशाच एका कलावंताचा जेंव्हा वास्तवाशी सामना होतो तेंव्हा काय होतं. ते हे नाटक.
आणखी एक पैलू आहे ह्या नाटकात. नटाच्या आयुष्यात असं एक चरित्र येतं. ते रंगावताना तो त्यात इतका गुंततो की त्या चरित्राची भूमिका तीच त्याची भूमिका तो समजू लागतो. इतका की तो नट आहे हेच तो विसरू लागतो. हे टोक ही कलावंतांच्या आयुष्याला हानिकारक. नाटकात कलावंताची बायको त्याला त्याची जाणीव करून देत म्हणते की, ‘स्वतःची भूमिका मांडण्यासाठी जे शस्त्र तुझ्या हाती होतं तेच तू टाकून कसं चालेल. तू एक नट आहे हे तू कसं विसारतोस?’ आपल्या सगळ्या सामाजिक जाणिवा आणि भूमिका अढळ ठेवून डॉ. लागू आणि निळूभाऊंनी शेवटपर्यन्त हातातलं शस्त्र टाकलं नव्हतं याची तेव्हा आठवण होते.
हे नाटक किती चांगलं आहे किंवा त्यात काय जमलेलं नाही हे सांगणारी ही समीक्षा नाही. पण मराठी रंगभूमीवर आलेलं हे अत्यंत महत्वाचं नाटक आहे इतकं मी नक्की म्हणेन. चारचौघी नंतरचा हा चंद्रकांत कुलकर्णी यांचा ग्रेट कमबॅक आहे असं माझं मत आहे.
हे नाटक प्रत्येक सजग नागरिकाने पाहिलच पाहिजे. सजग नसाल तरी पहा. कारण तुमचं transformation करण्याची ताकद ह्या नाटकात आहे.
पडदा पडल्यावर : कलाकारांबरोबर सेल्फी काढण्याचा नवीन प्रघात. येणारे प्रत्येक कुटुंब नाटकातल्या जयंत कुटुंबियांबरोबर सेल्फी काढत होते. तसे काढत असताना ते सौ. उल्का जयंत यांना, “आम्ही खूप रीलेट केले हे नाटक” असं सांगत होते. पण त्यातले फारच थोडे बाजूला उभा असलेल्या सोमनाथबरोबर सेल्फी काढत होते.
येणारे प्रेक्षक कुटुंबीय कशाशी ‘रीलेट’ करत होते आणि ज्याला टाळत होते तो सोमनाथ कोण हे नाटक पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल. तेंव्हा नाटक चुकवू नका.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
