अहमदनगरमधील सीएसआरडी संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर | २६ डिसेंबर | प्रतिनिधी
(Ahilyanagar News) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नाताई कांबळे यांनी लिहिलेल्या ‘पारंबी आरोग्याच्या वटवृक्षाची’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता अहमदनगरमध्ये सीएसआरडी संस्थेच्या सभागृहात होत आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि कवी नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा होणार आहे.
(Ahilyanagar News) ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील ज्येष्ठ आरोग्यसेविका पारुबाई चांडे, सरुबाई साळवे, रत्ना जाधव यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.
सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ. सुरेश पठारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ.शोभा आणि डॉ.रवी आरोळे, लोकमतच्या नगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके यांची प्रमुख उपस्थिती असेल.
रत्नाताई कांबळे यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून ५० वर्षं नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महिला सबलीकरण, आरोग्य, ग्रामविकास या क्षेत्रात काम केले. आज त्यांचे वय ८० वर्षं आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा पुस्तकातून मांडला. हे पुस्तक केवळ रत्ना कांबळे यांचे आत्मचरित्र नसून ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संस्थाचरित्रवजा दस्तावेज आहे. हे पुस्तक रत्ना कांबळे यांची एकटीच्या आयुष्याची कहाणी नाही तर ग्रामीणआरोग्य प्रकल्प या आरोग्य आणि ग्रामविकासाच्या भारतातील आगळ्यावेगळ्या प्रयोगाची कहाणी आहे.
रत्ना कांबळे या मूळच्या शिक्षिका असून काही काळ शिक्षकीपेशात काम केल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू डॉ.रजनीकांत आरोळे यांच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात पूर्ण वेळ सामाजिक कार्याला सुरुवात केली. कर्जत आणि जामखेड या अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये आणि अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरातील आदिवासी गावांमध्ये त्यांनी प्रामुख्याने काम केले. त्यांना सामाजिक कार्यासाठी राज्य सरकारचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दैनिक लोकमतचा राज्यस्तरिय कार्यगौरव पुरस्कार, दैनिक सकाळचा गौरव पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले.
ग्रामीण आरोग्य प्रकल्प ही संस्था डॉ.रजनीकांत आणि मेबल आरोळे या दाम्पत्याने १९७० मध्ये स्थापन केली. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील आरोग्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून जे प्रयोग या संस्थेने केले ते सरकारी पातळीवर आरोग्यविषयक धोरण ठरवण्यासाठी दिशादर्शक ठरले. या कामाची दखल घेत आरोळे दाम्पत्याला रेमन मॅगसेसे आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
रत्नाताई कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून स्वत:ची जडणघडण कशी झाली आणि आपण पूर्णवेळ सामाजिक कार्यात कसे उतरलो याबद्दल सुरुवातीच्या भागात लिहिले आहे. त्यानंतर ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या कामाविषयी आणि ते काम करत असलेल्या अनुभवाविषयी लिहिले आहे. ग्रामआरोग्य सेविका हे ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे महत्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. Barefoot Doctor अशी ग्रामआरोग्य सेविकांची संकल्पना आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात जिथे प्रशिक्षित आरोग्य मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे गावातील सर्वसामान्य महिलांना प्राथमिक आरोग्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनीच गावाच्या आरोग्याची काळजी घ्यायची, असे मॉडेल ग्रामीण आरोग्य प्रकल्पातून राबवले गेले. ‘आशा कर्मचारी’ या सरकारच्या संकल्पनेसाठी ‘ग्रामआरोग्य सेविका’ हे मॉडेल दिशादर्शक ठरले. ग्रामआरोग्य सेविकांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्या माध्यमातून गावोगाव महिला विकास मंडळांची स्थापना करणे ही रत्नाताई कांबळे यांची प्रमुख जबाबदारी होती. हे काम करत असताना आलेले अनुभव त्यांनी मांडले असून त्यातील काही ग्रामआरोग्य सेविकांच्या आयुष्याचा पटही मांडला आहे.
लालनबाई नावाच्या चौथी शिकलेल्या ग्रामआरोग्य सेविकेला रत्नाताई कांबळे ग्रामीण आरोग्य चळवळीतील आपला गुरू मानतात. दलित शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या लालनबाई ग्रामआरोग्य सेविका झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाचा कसा कायापालट केला, पारुबाई चांडे या दुर्गम धनगर वस्तीवरील महिलेने आपले गाव श्रमदानाने कसे बदलविले आणि याची दखल घेत तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी पारुबाई आणि रत्नाताई कांबळे यांना दिल्लीला भेटीसाठी कसे पाचारण केले, कुष्ठरुग्ण आईच्या पोटी जन्माला आलेल्या बायडाबाईंना कुष्ठरोगाच्या अज्ञानापोटी सासरच्यांकडून काय-काय त्रास भोगावा लागला आणि पुढे आरोग्यसेविका म्हणून त्यांनी कुष्ठरोगाबाबत गैरसमज दूर करण्यात कशी महत्वाची भूमिका बजावली, असे या ग्रामआरोग्य सेविकांचे अनुभव आणि त्यातून ग्रामीण भागात झालेल्या या ‘आरोग्यक्रांती’चा लेखाजोखा मांडला आहे.
या महिलांपैकी एकेका महिलेचे आयुष्य म्हणजे एकेक कादंबरी आहे. वैयक्तिक आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करत, प्रचंड संघर्ष करत आपले गाव, आपला परिसर बदलून दाखवला. हे सर्व मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ग्रामआरोग्य सेविका हा प्रयोग ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने कसा महत्वाचा ठरला आणि सरकारने त्याच धर्तीवर राबवलेली आशा कर्मचारी ही संकल्पना कशी महत्वाची आहे यावर या पुस्तकात सविस्तर टिपण आहे.
एचआयव्हीग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामही ग्रामीण आरोग्य प्रकल्पाने केले आहे. रत्ना जाधव या एचआयव्हीग्रस्त महिलेने हिंमत दाखवून ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या शेताची जबाबदारी सांभाळली आणि तिच्या या कामाची दखल घेऊन तिला २०१८ मध्ये स्वित्झर्लंडला मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून आमंत्रित करण्यात आले. रत्ना जाधवची संघर्षमय कहाणीही रत्नाताई कांबळेंनी या पुस्तकात मांडली आहे.
कर्जत-जामखेड तालुक्यात महिला विकास मंडळांची स्थापना करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उपक्रमाबद्दल या पुस्तकात सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.
कर्जत-जामखेडनंतर अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील आदिवासी भागात रत्नाताई कांबळे यांनी १९९० ते २००५ या कालावधीत काम केले. कुपोषण आणि बालमृत्यू रोखणे हे या भागातील आव्हानात्मक काम होते. हे काम करत असताना अंधश्रद्धा हा एक मोठा अडसर होता. त्यावर मात करून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, ग्रामआरोग्य सेविकांना प्रशिक्षित करून कशाप्रकारे या भागात काम केले याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे.
ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे उद्दिष्ट अत्यंत सविस्तरपणे रत्नाताई कांबळे यांनी या पुस्तकातून मांडले आहे. NGO for the sake of NGO असा हेतू न ठेवता सरकारला धोरण निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल असे आरोग्य आणि ग्रामविकासाचे मॉडेल उभारणे हे उद्दिष्ट राहिले आहे. हे कशाप्रकारे करून दाखवले हे या पुस्तकातून मांडले आहे.
आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याविषयी अभ्यासपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या युनिक फौंडेशनकडून या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पुस्तकाचा हेतू महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राबवलेल्या आरोग्य, ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रयोगाची माहिती समोर आणणे आणि सद्यस्थितीत या विषयासंबंधी प्रश्नाची उत्तरे या प्रयोगातून मिळू शकतील का याची मांडणी करणे हा आहे.
Read This: History: The Indians: A Useful Reference Book for Scholars of South Asian History