सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारीता, साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न
नेवासा | २३ डिसेंबर | भैरवनाथ वाकळे
(Cultural Politics) नेवासा तालुक्यातील तरवडी येथील माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारीता, साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी ता.२२ डिसेंबर रोजी करण्यात आले. यावेळी राज्यभरातून अनेक साहित्यरसिक, सत्यशोधक व प्रगतीशिल विचाराचे लोक आले होते.
(Cultural Politics) पुरस्कार वितरण भाकपचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कांगो यांच्या हस्ते झाले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आ.नरेंद्र पाटील घुले कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. यावेळी मंचावर ‘द हिंदू बिझनेस लाईन’ वृत्तपत्राचे सहसंपादक डॉ.राधेशाम जाधव, ॲड.देसाई देशमुख, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आ.पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमनाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मुकुंदराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरणापुर्वी परिक्षक प्रा.डॉ. सुधाकर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यशोधक मुकुंदराव पाटील पुरस्काराचे वेगळेपण त्यांनी यावेळी श्रोत्यांना दाखवुन दिले. पुरस्कारांचा बाजार आजुबाजूला कसा सुरू आहे हे सांगितले. यावेळी ते म्हणाले, मुकुंदराव पाटलांचा प्रागतिक विचार ज्या पुस्तकांतून येतो, त्या पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो. याचीच आज नितांत गरज आहे. आंबेडकर…आंबेडकर..म्हणण्याचीच गरज आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचीच धपरा पुढे चालविणारे मुकुंदराव पाटील असतील, आम्हाला जे काही स्वर्गासारखे सुख मिळालेले आहे आज, ते याच लोकांमुळे मिळाले आहे. कुठल्या भगवंताच्या आमच्या पूर्वजांनी अनेक प्रार्थना केल्या, अनेक नावे घेतली म्हणून मिळालेले नाही. सध्या उल्टे वारे वहात आहेत हे उल्टे वारे थांबविण्यासाठी अशा पुरस्कारांची व कार्यक्रमाची गरज आहे असे सांगुन परिक्षक प्रा.डॉ. सुधाकार शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
साहित्य पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथील ‘द हिंदू बिझनेस लाईन‘चे सहसंपादक पत्रकार डॉ.राधेशाम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने तर निवृत्त प्राचार्य डॉ.अशोक काळे, नागपूर (अपहरण – कादंबरी), डॉ.संदिप राऊत, अमरावती (चरित्र – नवयुग प्रवर्तक नवनिर्माते संत गाडगेबाबा), डॉ.श्रीधर पवार, मुंबई (संशोधन – ब्लॅक पँथर), सुनिल शेलार, नाशिक (कथा – झापड), डॉ.गोविंद काळे, लातूर (समिक्षा – दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची खंडकाव्ये) यांना साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.