पुणे (प्रतिनिधी) १४.६.२०२४
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौफुला ता. दौंड येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध इतिहास संशोधक तथा ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘निर्भय बनो’चे निखिल वागळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
तिसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन ता. १६ व १७ जून रोजी होणार आहे. संमेलनाच्या संयोजन बैठकीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, सुशांत जगताप, बाळासाहेब मुळीक, अरविंद जगताप, रामभाऊ नातू उपस्थित होते. साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाध्यक्ष संजय सोनवणी हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक आणि इतिहास संशोधक आहेत, त्यांची कादंबरी, नाट्य, चित्रपट, गीत-संगीत, काव्य क्षेत्रातील कामगिरी गाजलेली असून ते आघाडीचे इतिहास संशोधकही आहेत. त्यांचे आजवर एकूण १०९ पुस्तके इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध झालेली आहेत. पानिपत, क्लिओपात्रा, शून्य महाभारत, असुरवेद, मृत्यूरेखा, सव्यसाची यासारख्या कादंबऱ्या तर त्यांनी लिहिल्या आहेत. जातीसंस्थेचा इतिहास, Origins of the Vedic Religion & Indus-Ghaggar Civilisation, Origins of the language, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, काश्मीरचा सम्राट ललितादित्य, शोध भारत नावाचा, हिंदू धर्म, हिंदू आणि वैदिक धर्माचा इतिहास यासारखे संशोधनात्मक ग्रंथ आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे त्यांना प्राचीन व्यापारी मार्गाचे संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळाली होती. ते संशोधन भांडारकारच्या ९९ व्या वार्षिक इतिवृत्तात प्रसिद्धही झाले आहे. त्यांचा ‘स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर’ हा चरित्रग्रंथ मराठीमध्ये प्रकाशित असून त्यांचे Unsung Hero of India: Maharaja Yashvantrao Holkar हे पुस्तकही इंग्रजीत प्रकाशित आहे. त्यांचे तीन कवितासंग्रहही प्रसिद्ध असून, मॉन्सून सोनाटा हा कवितासंग्रह इंग्रजीत अनुवादित होऊन प्रसिद्ध झाला असून त्यातील निवडक आठ कवितांची संगीतमय ध्वनिफीतही साडेतेरा हजार फुट उंचीवरील लेह येथे उणे १६ अंश तापमानात प्रसिद्ध करण्यात आली होती. हा जागतिक विक्रम आहे. त्यांनी दिलेल्या संगीतावर उषा मंगेशकर, नितीन मुकेश आणि राहुल दातार सारखे गायक गायलेले आहेत. अलीकडेच त्यांची ‘भविष्य नावाचा इतिहास’ ही महत्वाची भविष्यवेधी कादंबरी आणि ‘भाषांचा उगम’ हे भाषाशास्त्रात केलेल्या नव्या संशोधनाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.