अहमदनगर (प्रतिनिधी) १०.६.२४
नगर अर्बन बँकेच्य घोटाळ्याचा बारकाईने अभ्यास केला असता बँकेची लूटमार करण्याच्या अनेक पध्दती तत्कालीन संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वापरल्या आहेत. यात बोगस कर्जे करून ती कर्जरक्कम प्रथम संबंधित कर्जदारांच्या नगर अर्बन बँकेतील चालू खात्यात वर्ग करायची नंतर तेथून दुसऱ्या बँकेत, पतसंस्थांमध्ये पाठवायची, अपहार करायचा. या पध्दतीने जवळपास १०० ते १५० कोटी रूपयांचा अपहार, लूट केलेली आहे.
या बोगस कर्जातील अनेक कर्जदार हे दुसरे बँकेतील थकबाकीदार, एनपीए खातेदार होते. नगर अर्बन बँकेच्या पैशातून त्या बँकांचा एनपीए कमी करण्यात आला. साहजिकच नगर अर्बन बँकेचा एनपीए प्रचंड वाढला, बँक बंद झाली.
बँकींगमध्ये आपण पाहतो एनपीए वसूलीसाठी वसूली एजंट नेमले जातात, त्यांना भरपूर कमिशन दिले जाते. नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी यांनी इतर काही बँकांचे वसूली एजंट असल्यासारखे काम केले. त्या बँकांचे एनपीए वसूलीचे मोठे काम करून दिले. याचेच ठळक व सर्वात मोठे उदाहरण म्हणजे संगमनेरचे अमित पंडीतचे कर्जप्रकरण. अमित पंडीत याचे पॅरिस इस्पात नावाने कॉसमॉस बँकेत तब्बल ४० ते ५० कोटींचे एनपीए खाते होते. त्याची वसूली होत नव्हती. नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी यांनी अमित पंडीतला वेगवेगळ्या नावाने व वेगवेगळ्या कारणांसाठी मोठी-मोठी कर्जे मंजूर केली. नगर अर्बन बँकेची एकाच नावाने अधिकतम कर्ज मर्यादा ९ कोटीची होती. ही वेगवेगळ्या नावांने मंजूर केलेली कर्जे कॉसमॉस बँकेत जमा होताना एकाच एनपीए कर्ज खात्यत जमा झाली. ही नगर अर्बन बँकेची, ठेवीदरांची, सभासदांची खुप मोठी फसवणुक आहे, विश्वासघात आहे. कॉसमॉस बँकेचा एनपीएची मोठी वसूली यामधून झाली. यात अमित पंडीतला एकरकमी परतफेड योजनेच्य नावाखाली कोट्यावधी रुपयांचा फायदा देखील मिळाला. म्हणजे अंदाजे ४०/५० कोटी रूपयांचे कर्ज ३२ कोटीत मिटविण्यात आले.
यातून अगोदरच खुप मजबूत असलेली कॉसमॉस बँक आणखी मजबूत झाली व एनपीए वाढीने कमजोर झालेली नगर अर्बन बँक आणखी जास्त कमजोर झाली, शेवटी बंद पडली.
कॉसमॉस बँक हे एक उदाहरण झाले इतर काही चार पाच बँकांची एनपीए वसूली नगर अर्बन बँकेच्या भ्रष्ट संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून दिल्याचे फॉरेंसिक ऑडीटमधून स्पष्ट झाले आहे.
नगर अर्बन बँकेतील सत्तेचा व अधिकाराचा गैरवापर करून नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे दुसऱ्या बँकांचा एनपीए कमी करण्यासाठी वापरले गेले. दुसऱ्या बँका खुप सुस्थितीत आहेत, खरेतर न्यायालयाने संबंधित बँकांना आदेश देवून नगर अर्बन बँकेचे पैसे व्याजासह परत करायचे सांगितले पाहिजे
त्या बँकांनी त्यांची थकबाकी नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळाला हाताशी धरून नगर अर्बन बँकेच्या गळ्यात मारली होती. तीच रक्कम परत करायची एवढे झाले तरी नगर अर्बन बँकेला कमीत कमी ३०० कोटी रुपये आजच्य हिशोबाने ताबडतोब मिळू शकतात.ल बँक पुन्हा सुरू होवू शकते.
असा न्याय मागितला जावू शकतो का? याबाबत माननीय उच्च न्यायालयात एखादी याचिका दाखल होवू शकते का ? हे नक्कीच तपासून पाहीले पाहीजे. यातील एका बँकेने नगर अर्बन बँकेच्या चेअरमनला खुप मोठी सवलत देवून त्या बँकेतील कर्ज बंद केले होते. हे अप्रत्यक्ष बक्षीस समजले जावू शकते. हा चमत्कार झाला तर नगर अर्बन बँकेचे ठेवीदारांना सर्व पैसे परत मिळून नगर अर्बन बँक पुन्हा सुरू होवू शकते.
नगर अर्बन बँकेत बँक लूटमारीची दुसरी एक पध्दती वापरली ती म्हणजे किरकोळ उचल (Sundry Advance) या नावाने कोट्यावधी रूपये उचलण्यात आले व अपहार करण्यात आला. यात फर्निचर कामाच्या नावाखाली सर्वात जास्त उचल दाखविलेली आहे. कोटेशन नाही, बिले नाही, जीएसटी नाही, मनात आले की पैसे उचलायचे. एटीएम मशिन, एटीएम कार्ड, केवायसी पुर्ण करण्याचे काम, फ्रँकींग मशीन, सॉफ्टवेयरचे काम अशी वेगवेगळ्या कामाचे नाव पूढे करून किरकोळ उचल दाखवून कोट्यावधी रूपये अक्षरशः लूटण्यात आले. एका वेळेस दोन-दोन कोटी रुपये किरकोळ उचलच्या नावाखाली दाखविण्यात आलेले आहेत. या किरकोळ उचलच्या नावाखाली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पैसे उचलणारे सर्वजण खुप धनाढ्य आहेत. ताबडतोब एकाच वेळी पैसे व्याजासह परत करू शकतात. त्यामुळे बँक पुन्हा सुरू होवू शकते.
नगर अर्बन बँकेची लूटमार करण्याची तिसरी प्रमुख पध्दती वापरली गेली. ती म्हणजे बनावट सोनेतारण. बँकेत बनावट सोनेतारण होवू नये म्हणून २०१४ मध्ये गोल्ड चेकींग मशीन घेण्यात आले होते. २०१४ साली मी बँकेत संचालक होतो. माझ्यसह माझे सहकाऱ्यांनी आग्रह करून ही मशिन घ्यायला लावली होती. ऑक्टोबर २०१४ ला १४ लाख रुपये खर्च करून ही मशिन खरेदी केली. वेगवेगळ्या शाखांमध्ये अचानक भेट देवून तेथील सोने तारणातील सोन्याची शुध्दता मशिनद्वारे तपासायची असे ठरले होते परंतु दुर्दैवाने दोनच महिन्यानंतर म्हणजे डिसेंबर २०१४ मध्ये बँकेची निवडणुक झाली. आमचा प्रामाणिक संचालकांचा ग्रुप पराभूत झाला. नंतर या गोल्डचेकींग मशीनचे पँकींगसुध्दा काढले गेले नाही. दहा वर्षानंतर आज देखील ती मशीन तशीच पँकींगमध्ये आहे.
याचाच दुष्परिणाम नगर अर्बन बँकेत शेवगाव शाखा, चाकण शाखा, औरंगाबाद शाखा, कोपरगाव शाखा, सिन्नर शाखा येथे मोठे-मोठे बनावट सोनेतारण घोटाळे झाले. शेवगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी लेखी पत्र देवून शाखेत बनावट सोने मोठ्या प्रमाणावर असल्याचे ऑगस्ट २०१८ मध्ये सांगितले होते. तरी सुद्धा या मशिनचा वापर केला गेला नाही म्हणजे या बनावट सोने, तारणात देखील संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी सहभागी होते, हे स्पष्ट होत आहे. बँकेच्या अंतर्गत लेखापरिक्षकांनी देखील २०१८ मध्ये विचारले होते ही मशीन का वापरत नाही?
आणखी खुप काही आहे… परंतु एक नक्की सांगतो योग्य साथ मिळाली तर नगर अर्बन बँक ही निश्चितपणे पुन्हा सुरू होवू शकते. यासाठी व्यापक व सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– राजेंद्र गांधी,
बँक बचाव समिती, महाराष्ट्र
9423793321