ग्यानबाची मेख
अहमदनगर | २५ जानेवारी | राजेंद्र देवढे; विशेष प्रतिनिधी
(social) श्रीमान आशिष येरेकर साहेब, आपण परवा पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर प्राथमिक शाळेस भेट दिल्यानंतर, एका प्राथमिक शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा सूमार असल्याच्या कारणावरुन त्यांना निलंबित केल्याचे वृत्त वाचण्यात आले. तसा, आपल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा मला अधिकार नाही. परंतु, अशी तत्परता आपण इतर बाबतीत दाखवत नाहीत, यावर माझा रास्त आक्षेप आहे.
(social) मुख्यमंत्री (Devendra Fadanavis) महोदयांनी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. त्यानुसार, आपण जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या व पुर्णत्वास गेलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचेही समजते. अर्थात, आपल्या कृती आराखड्यात नेमकं काय समाविष्ट आहे, हे आपणालाच ठाऊक आहे. शैक्षणिक क्षेत्रही याला अपवाद नसावं. म्हणूनच कदाचित आपण हा ‘आपटबार’ काढला असावा. तसंही काहीतरी हटके करुन स्वतःची वेगळी इमेज तयार करणं गरजेचं आहे. अलिकडे राजकारणात तर हे आवर्जुन बघायला मिळतं. ‘मिशन आरंभ‘ शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा ही आपली अभिनव संकल्पना कौतुकास्पदच म्हणावी लागेल. कारण, आपणांसारखे प्रयोगशील अधिकारी अभावानेच आढळतात. ते आमच्या जिल्ह्याला लाभले, हे आमचं अहोभाग्य म्हणावं लागेल. फुले दांपत्याच्या कार्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर यानिमित्ताने त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी आपलं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
परवा, तिसगावात आपण जो ‘रामशास्त्री बाणा’ दाखवला, तसाच इतर क्षेत्रांतही दाखवला तर हा अहिल्यानगर जिल्हा कृतकृत्य होईल. फक्त त्यासाठी एकमेव सॉफ्टटार्गेट असलेलं शैक्षणिक क्षेत्र निवडू नका. शासनाच्या ज्या काही जनहिताच्या योजना आहेत, तिथं काय काय चाललंय हे आपणांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला नक्कीच ठाऊक असेल. कामांच्या व्यापामुळे जर आपल्या अपरोक्ष काही अनुचित प्रकार होत असतील तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. परंतु जाताजाता आपण, आमच्या जिल्ह्यातील भ्रष्टाचार नाहीसा करावा, ही विनंती.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व काही पुर्णत्वास गेलेल्या पेयजल योजनांचं आपण ‘शवविच्छेदन’ केलं तर आमच्या जिल्ह्यावर आपले फार उपकार होतील. परवा आपण दिलेल्या एका शिक्षकाच्या निलंबनाच्या आदेशामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण, तो फक्त ट्रेलर असावा असं आम्हाला वाटतं. तसंही अगदी गावगन्ना पुढारीही शिक्षक नावाच्या अश्राप प्राण्यावर रुबाब करत असतोच.