प्रशासनाने पुरेशा गांभीर्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली नसल्याचा आरोप
परभणी | १६ डिसेंबर | प्रतिनिधी
येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागणी केली आहे की, संविधान प्रतिकृतीचा अपमान (Crime) निषेधार्थ घटना तसेच सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरणी न्यायिक आयोगा मार्फत चौकशी करून जबाबदार प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी.
अधिक माहिती देताना कॉ. राजन क्षिरसागर यांनी सांगितले, ता.१० डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधान प्रतीकृतीच्या अपमान करणारी (Crime) निषेधार्य घटना घडली. जिल्हाधिकारी कचेरीसमोर असणाऱ्या ठिकाणी झालेल्या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र प्रशासनाने पुरेशा गांभीर्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली नाही. पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीमुळे आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या. याचे निमित्त साधून पोलिसांनी बेकायदेशीरपणे दलितवस्त्यांना टार्गेट करीत धडपड व मारझोड करीत अटकसत्र चालविले. या अटकसत्रात अनेक निरपराध देखील भरडून काढले. पोलीस प्रशासनाच्या बेकायदेशीर व अत्याचार करणाऱ्या कार्यपद्धतीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडी मधून मृत्यू झाला.
कॉ. क्षिरसागर पुढे म्हणाले, न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि दहा डिसेंबर रोजीपासून सुरू झालेल्या घटनाक्रमात काही हितसंबंधीयांचे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय हेतूने प्रेरित असणाऱ्या घटनाक्रमांच्या न्यायालयीन व निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय सत्य समोर येणार नाही. यासाठी ‘निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ‘न्यायिक आयोग’ नेमून चौकशी करावी आणि दोषी प्रशासन व हितसंबंधी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत आहे.
महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल भाजपा पक्षपाती कार्यपद्धती राबवून समाजात द्वेष भावनांना खतपाणी घालत आहे. याचा धिक्कार भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आहे, असेही राजन क्षिरसागर यावेळी म्हणाले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मागण्या करण्यात आल्या की, सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू आणि दहा डिसेंबरच्या घटनेसह संपूर्ण घटनाक्रमाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग नेमून चौकशी करा आणि दोषी प्रशासन व हितसंबंधी यांच्या विरोध कारवाई करा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास पंचवीस लाख नुकसान भरपाई व आर्थिक मदत करा. हिंसाचारातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करा. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात बेजबाबदार व्यवहार करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करा. निरपराध व्यक्तींविरुद्ध दाखल केलेले खटले रद्द बादल करावेत.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष परभणी जिल्हा कौन्सिलचे माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल, ओंकार पवार, लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, मितेश सुक्रे आदी उपस्थित होते.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.