तीनदा विधानसभा गाजवलेला हा कामगारांचा नेता, कामगारांकडूनच अपमानित होऊन रिटायर होतोय
समाजसंवाद | २९ नोव्हेंबर | सरफराज अहमद
Cultural Politics माझे वडील लक्ष्मी विष्णू गिरणीत घडी खात्यात कामगार होते. १९९० च्या दशकात पाच सात हजार रुपये कमवायचे. जागतिकीकरणाने सोलापूरच्या कापड उद्योगाची घडी विस्कटली. लक्ष्मी विष्णूला घरघर लागली. अखेर गिरणी बंद पडली. जुन्या गिरणीपासून गिरण्या बंद पडायचा सुरु झालेला अध्याय २००० साल उजाडेपर्यंत जवळपास सर्वच गिरण्यांना बंद पाडून संपला. गिरण्या बंद पडल्या तश्या चाळी रिकाम्या झाल्या. गिरण्यात ऐटीत काम करणारे कामगार रस्त्यावर आले. पडेल ते काम करुन पोटाची खळगी भरत होते. अनेक कामगारांनी त्या काळी आत्महत्या केल्या.
Cultural Politics मी पुढारीत असताना कामगार आयुक्त कार्यालयातून आकडेवारी गोळा केली. किती कामगारांची देणी बाकी आहेत ते शोधलं. तर विसेक कामगार असे होते, ज्यांची देणी घेण्यासाठी कुणीच आलं नाही. त्या कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं काय झालं असेल? त्यांच्या देय रकमा घेण्यासाठी त्यांचे वारस का आले नसतील? ते हयात आहे की नाहीत? हा प्रश्न अनेक दिवस मला सतावत होता. पुढे पत्रकारीता सोडली आणि माझा शोध थांबला.
२००० च्या दशकात गिरण्या बंद पडल्या, त्यावेळी सोलापूरातील वेश्यांची संख्या वाढल्याचे काही लोक सांगतात. काही लोक हमालांची, विटभट्टी कामगारांची, विडी कामगारांची संख्या वाढल्याचे सांगतात. एकूण काय, तर गिरणीतला कामगार आणि त्यांच्या स्त्रिया ही पडेल कामे करु लागली होती. सोलापूर हे एकमेव शहर आहे, ज्याची लोकसंख्या वाढण्याऐवजी स्थलांतरामुळे घटली होती. त्याकाळी सोलापूरात तीन चार हजार कमावणारे कामगार हजार – दिड हजार भाडे भरायचे. डोक्यावर छप्पर असेल तर उपाशीही झोपता येतं या न्यायाने भाड्याच्या घरात राहायचे. अशा काळात आडम मास्तर नावाच्या अवलीयाने कामगारांसाठी गोदुताई परुळेकर घरकुल उभारलं. दहा हजार कामगारांना पाचशे चौरस फुटांचं घर दिलं. पक्कं बांधकाम असलेलं हे घर देण्यासाठी त्यांनी वर्षाकाठी फारतर हजार बाराशे रुपये घतले असतील. (आज त्या भागात नुसत्या जागेचे दर १५०० रुपये चौ.फु.आहेत.) झोपड्यामध्ये, भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या कामगाराला हक्काचं घर मिळालं.
पुढे आडम मास्तरांनी अल्पसंख्यांकांसाठी चोवीस हजार घरांचे प्रकल्प उभे केले. काँग्रेस नेत्यांनी आडम मास्तर फसवी योजना आणत आहेत म्हणून मोर्चे काढले. गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पण मास्तर डगमगले नाहीत. अवघ्या पाच सात वर्षात हा ‘रे नगर’चा प्रकल्प उभा केला. पुर्वी दहा हजार व आता चोवीस हजार कामगारांना म्हणजे चौतीस हजार घरे देण्याची किमया अख्ख्या जगात फक्त आडम मास्तरांनी करुन दाखवली होती.
आडम मास्तर २००४-०९ विधानसभेत होते त्या पाच वर्षात विधानसभेत अल्पसंख्यांकांविषयी चारशे ते पाचशे प्रश्ने विचारली गेली. त्यातील तीनशे मास्तरांकडून विचारलेली होती. कारण ते ज्या शहर मध्यचे (पुर्वीचे शहर दक्षिण) प्रतिनिधीत्व करायचे ते मतदारसंघ असंघटीत अल्पसंख्यांक कामगारांचे होते.