मॉन्सेन्टो BG कापुस बियाण्यातील (Cry1ac, Cry1ab) प्रथिनांच्या प्रमाणाची तपासणी करुन परभणी जिल्हा आणि परिसरातील (Agriculture) शेतकऱ्यांना आश्वस्त करावे, अशी मागणी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
अधिक माहिती देताना कॉ.प्रसाद गोरे म्हणाले, शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. अव्वाच्या सव्वा भावाने महाग बियाणे शिवाय महागडी खते, आणि कोणत्याही भावाचे नियंत्रण नसलेली फवारणीची औषधे यावर हजारो रुपये खर्च करावा लागत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. Agriculture
कॉ.राजन क्षिरसागर यांनी अधिक माहिती देताना सांगितले, यामागचे मुख्य कारण म्हणजे माॅन्सेटो – महिको कंपनीने आणलेल्या बोलगार्ड-२ बियाण्यात दोन प्रथिनांचे (Cry1ac, Cry1ab) प्रमाण कमी ठेवण्यात आले. यामागचा हेतू स्पष्ट आहे की, प्रभावी बोलगार्ड बियाण्यामुळे किटकनाशक उत्पादक कंपन्यांचा धंदा घाट्यात येवू नये. माॅन्सेटो कंपनी अनेक किटकनाशकांचे उत्पादन करते.
ते पुढे म्हणाले, ही बाब ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ के.आर. क्रांती यांनी मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येथील सर्वेक्षण व प्रयोगशाळेच्या निष्कर्ष यातून सिद्ध केली आहे. याबद्दल त्यांनी शासनास शिफारस केली की, वरील प्रथिनांचा समावेश असल्याशिवाय कापूस बियाणे विक्री करण्यास प्रतिरोध करावा. वरील प्रथिने असलेले व शेंदरी बोंडआळीस प्रतिरोध असलेलेच बियाणेच शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. माॅन्सेटो (आणि आता सिजेंटा) या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध धोक्यात आणणाऱ्या कृषिशास्त्रज्ञ के.आर. क्रांती यांची तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांनी उचलबांगडी केली. तर महाराष्ट्र सरकारने याबाबत पूर्ण दुर्लक्ष करून माॅन्सेटो (आणि आता सिजेंटा) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या हितसंबंध यांची भलावण करण्यासाठी फक्त बियाणे पाकीटावर ‘हे बियाणे शेंदरी बोंडआळीस प्रतिरोधक नाही’ असा शिक्का मारून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने चालवली. बियाणे कंपन्या आणि औषधी कंपन्यांना मुनाफ्याची पक्की गॅरंटी देण्यात आली. यामुळे वाढत्या लागवड खर्चाचा बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत असुन कापूस उत्पादक देशोधडीला लागत आहे.
शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावणे आणि शेतकरी आत्महत्या रोखणे, हे कृषी विद्यापीठापुढचे मोठे आव्हान आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत मॉन्सेन्टो BG-२ कापुस बियाणातील (Cry1ac, Cry1ab) प्रथिनांच्या प्रमाणाची तपासणी करुन परभणी जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांना आश्वस्त करावे, अशी विनंती कापूस उत्पादक व महाराष्ट्र राज्य किसानसभा परभणी शाखेच्या वतीने कुलगुरूंकडे मागणी करण्यात आली.
यावेळी किसानसभा जिल्हा सेक्रेटरी कॉ.ओंकार पवार, जिल्हाध्यक्ष कॉ.शिवाजी कदम, कामगार नेते कॉ.आब्दुल भाई, कॉ.प्रसाद गोरे, कॉ.निळकंट जोगदंड, कॉ.दयानंद यादव, कॉ.मितेश सुक्रे, कॉ.देविदास खरात आदी उपस्थित होते.