Social: महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांना जाहीर; १८ जानेवारीला होणार वितरण - Rayat Samachar

Social: महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांना जाहीर; १८ जानेवारीला होणार वितरण

रयत समाचार वृत्तसेवा
54 / 100

पुणे | १७ नोव्हेंबर | प्रतिनिधी

  Social अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या नामवंत संस्थेच्या वतीने दिला जाणारा दिलीप वि‌. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ.आ.ह. साळुंखे यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कारांची घोषणा काल पुणे येथे करण्यात आली. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांचे मासूमचे संयोजक डॉ.मनीषा गुप्ते आणि डॉ.रमेश अवस्थी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे व साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी ही माहिती दिली.

  पुरस्कार वितरण शनिवारी ता.१८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ. मीरा चड्डा – बोरवणकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रुपये, स्मृतिचिन्ह असे आहे. मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार देत असून या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून या पुरस्कारांचे नाव सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असे करण्यात आले आहे.

   पुरस्कारांच्या निवडीसाठी भारतात व अमेरिकेत स्वतंत्र निवड समिती होत्या. साहित्य पुरस्कार निवड समितीचे भारतातील अध्यक्ष सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, समन्वयक मुकुंद टाकसाळे, सदस्य गणेश कनाटे, जयश्री हरी जोशी, राम जगताप व अमेरिकेतील शोभा चित्रे, विद्युलेखा अकलूजकर, नंदन जोशी, सुजाता महाजन, रजनी शेंदुरे यांनी पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड केली.

      ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाच्या पुनर्लेखनात मूलभूत कार्य केले आहे. त्यांच्या तर्ककठोर व चिकित्सक मांडणीमुळे बहुजन साहित्य परंपरा उजेडात आणण्यास मदत झाली. आस्तिक शिरोमणी चार्वाक, बळीवंश, हिंदू संस्कृती आणि स्त्री, वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, सर्वोत्तम भूमिपुत्र गोतमबुद्ध, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, विद्रोही तुकाराम यांसारख्या भारतीय संस्कृतीकडे चिकित्सक दृष्टीने पहायला लावणाऱ्या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी आजवर बासष्ठपेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले असून मराठी विश्वकोशामध्ये धर्मशास्त्राच्या अनुषंगाने सुमारे शंभरपेक्षा जास्त नोंदी केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बहुमोल योगदान दिले. तसेच बालभारतीच्या इतिहास संपादक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
नाशिकचे विलास शेळके यांची ‘धरणसुक्त’ ही पाणलोट धरणाच्या निर्मीतीविषयीची महत्त्वाची कादंबरी. एरवी किचकट वाटणाऱ्या या विषयावर त्यांनी अनुभवाच्या आधारे अत्यंत दर्जेदार आणि तेवढीच वाचनीय कादंबरी गुंफलेली आहे. ही नाट्यमय कादंबरी नुसतीच नवनिर्मिती नाही, तर मैलाचा दगड ठरून अनेक वर्षे वाचक वाचत राहतील अशी साहित्य कृती आहे.
पुणे येथील अंजली चिपलकट्टी यांच्या ‘माणूस असं का वागतो’ या ग्रंथाला मिळालेला पुरस्कार पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा आहे. माणसाच्या (तुमच्या-आमच्या) विचारात आणि प्रत्यक्ष वागण्यात जी तफावत वेळोवेळी दिसून येते, तिच्यासंबंधी अतिशय विचक्षणपणाने केलेले हे विवेचन आहे. लेखिकेचे वाचन दांडगे, चिंतन-मनन त्याहून मौलिक आणि लेखन अतिशय सरळ, वाचनीय, अजिबात बोजड नसलेले आहे. या पुस्तकात समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, आत्मज्ञान, तत्वज्ञान, राजकारणासंबंधी तत्वज्ञान, बोलिभाषा आणि लिखितभाषा अंगाने मानवी वर्तनावर लेखिकेने भाष्य केलेले आहे. भारतातील अनेक विषयांतील विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार करण्यासाठी आपल्यालादेखील हे लिखाण फार उपयुक्त आहे, संग्राह्य आहे.

 

Share This Article
Leave a comment