श्रीगोंदा | १८ ऑक्टोबर | अशोक होनराव
Election विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर २२६ श्रीगोंदा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. या विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेवून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सुचना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिल्या.
मुख्य पत्रकार परिषदेनंतर त्यांनी श्रीगोंदा तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या दालनातून माहिती देताना सांगितले की, आयोगाच्या निर्णयानुसार राजपत्र अधिसुचना जारी करण्याची तारीख २२/१०/२०२४ मंगळवार असून बुधवारी ता.२३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज २३ ऑक्टोबर ते मंगळवार २९ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील. प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी ता. ३० ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी माघारी घेण्याची मुदत सोमवार ता.४ नोव्हेंबरपर्यंत असेल तर सोमवार ता. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होईल व बुधवारी ता. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. विधानसभा निवडणूक करण्याची ता.२५ नोव्हेंबर असून या दिवशी ही प्रक्रिया पूर्ण होईल.
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात तीन लाख सदोतीस हजार तीनशे पंचान्नव (३,३७,३९५) मतदार असून त्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे सदुसष्ट (१,७५,४६७) हे पुरूष मतदार तर एक लाख एकसष्ट हजार नऊशे सहवीस (१,६७,९२६) महिला मतदार आहेत. इतरांमध्ये दोन तृतीयपंथी मतदार असून सैनिकांची मतदार संख्या एक हजार पाचशे पंचावन्न (१५५५) इतकी आहे. या एकूण मतदार संख्येत सात हजार आठशे एक्याऐंशी (७८८१) नवमतदार असणार आहेत. २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघासाठी ३४५ मतदान केंद्र असणार आहेत, गौरी सावंत यांनी सांगितले.
२२६ श्रीगोंदा विधानसभा निवडणूकीसाठी एकूण पोलींग स्टेशनपैकी तीन ‘मॉडेल पोलींग स्टेशन’ असणार आहेत. त्यामध्ये १ महिला संचलित, १ दिव्यांगासाठी व तिसरे युवा कर्मचारी संचलित असे एकूण तीन पोलींग स्टेशन मॉडेल असणार आहेत.
विधानसभेसाठी नामनिर्देशन दाखल करताना सर्वसामान्यांसाठी दहा हजार इतके डिपॉझिट असणार तर अनु. जाती, एस.सी व अनु. जमातीसाठी, एस. टी. साठी डिपॉझिट ५ हजार असणार आहे. उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात दाखल करता येतील. मतमोजणीचे ठिकाण प्रभाग ३ मधील शासकीय गोदाम, पेडगाव रोड हे असेल, असे सावंत म्हणाल्या.
मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी एकूण चाळीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पथके नियुक्ती करण्यात आली असून यापैकी तीन पथके राखीव असणार. त्यांच्यावर इव्हीएम मॅनेजमेंट, टपाली मतपत्रिका, मनुष्यबळ व्यवस्थापन अशा जबाबदारी असणार.
जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते व मतदार यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून गौरी सावंत यांनी कर्तव्यावर असणारे अधिकारी कर्मचारी यांचेसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.
प्रत्येक उमेदवारास निवडणूक खर्चाची मर्यादा रूपये चाळीस लाख असणार आहे. २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील ८५ वर्ष वयापेक्षा जास्त वय असणारे मतदार (ज्याची नोंदणी झाली आहे) अशा ज्येष्ठांकरिता तसेच चाळीस टक्यापेक्षा जास्त विकलांग असणारे मतदार व कोवीड बाधीत मतदार (ज्यांची नोंद झाली आहे) अशा मतदारांसाठी होम वोटींग सुविधा पुरविली जाणार आहे, असे शेवटी सावंत म्हणाल्या.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत असून त्यांना सहकार्य सहा. निवडणूक अधिकारी तहसिलदार क्षितीजा वाघमारे व निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार पंकज नेवसे हे करणार आहेत.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा