कोल्हापूर | २८ ऑगस्ट | प्रतिनिधी
गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ dear comrade डॉ.भारत पाटणकर हे दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकरी, बहुजन स्त्री-पुरुषांच्या मुक्तीदायी चळवळीत एक जीवनदानी कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. मार्क्सच्या विश्लेषण पध्दतीला फुले-आंबेडकर, स्त्री-मुक्ती चळवळ, पर्यावरणवादी चळवळ यांनी पुढे आणलेल्या सैध्दांतीक योगदानाची जोड देत शास्त्रीय समाजवादाची नवी मांडणी करणारे विचारवंत म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. मुद्दा आहे जग बदलण्याचा, पर्यायी विकास नीती, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, हिंदू कि सिंधू, क्रांतिसिंह नाना पाटील यासह अनेक पुस्तकातून मुलभूत वैचारिक मांडणी त्यांनी केली आहे.
केवळ वैचारिक मांडणी करून न थांबता तत्वज्ञानाला प्रत्यक्ष कष्टकऱ्यांच्या चळवळीशी जोडणारा मैदानातील एक लढाऊ कार्यकर्ता नेता अशी त्यांची वेगळी ओळख आहे. त्यातूनच बळीराजा धरण, भूमिहीनांसह सर्वच कुटुंबाना पाणी देणारी समन्यायी पाणी वाटपाची चळवळ पुढे आली. धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांची चळवळ असो की पवनचक्कीग्रस्तांची चळवळ असो, डॉ.भारत पाटणकर नेहमीच दलित, आदिवासी, स्त्रियांसह सर्वहारा वर्गाच्या बाजूने सकारात्मक हस्तक्षेप करीत आले आहेत.
श्रमिक, कष्टकऱ्यांचे लढे लढवत असतांनाचं विद्रोही सांस्कृतिक चळवळ, बडवे उत्पात हटाव आंदोलन, विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन, गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन या चळवळींची आपली सांस्कृतिक भूमिका निश्चित करण्यात त्याचा मोठा वाटा राहिला आहे.
जातीय अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर केवळप्रतिक्रियावादी चळवळ न करता जातीअंताची चळवळ करण्यावर ते ठाम भूमिका घेत आले आहेत. आजच्या धार्मिक विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर फॅसिष्ट शक्तीच्या विरोधात वयाच्या पंचाहत्तरीतही ते घट्ट पाय रोवून उभा आहेत.
लेखक, कवी, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ता-नेता आणि कुशल संघटक अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील प्रागतिक, परिवर्तनशील चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे. आपण त्यांच्या लढ्याचे, संघर्षाचे साक्षीदार राहिला आहात. येत्या वर्षभरात विवध उपक्रमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आमचा विचार आहे.
सुरुवात ०४ सप्टेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथे त्यांच्या नागरी सत्काराने होणार आहे. यानिमित्ताने या लढ्याचे, या संघर्षाचे दस्तऐवजीकरण करणे आम्हाला महत्वाचा वाटतो. त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांनी सहभाग घेतलेल्या, नेतृत्व केलेल्या चळवळी याचा मागोवा घेणारा एक ग्रंथ संपादित करण्याचा आमचा विचार आहे. जो पुढे चळवळींचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात येईल. याबरोबर डॉक्युमेंटरीसह वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमासाठी किमान ५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. डॉ.भारत पाटणकर यांच्या कार्यगौरव समारंभासाठी उपस्थित रहावे. याबरोबरच त्याच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने वर्षभर घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात आपला सहभाग महत्वाचा राहणार आहे. त्यासाठी आपल्याला शक्य होईल इतकी आर्थिक मदत करण्याचे आवाहन, ॲड. कृष्णा पाटील, मोहनराव यादव, सुधीर नलवडे, कॉ. संपत देसाई आदींसह डॉ.भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्यगौरव समितीने केले आहे. मदत 7083828081 या गुगल पे नंबरवर पाठवावी, असेही कळविण्यात आले आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा