अहमदनगर | १६ ऑगस्ट | प्रतिनिधी
आज कर्मवीर भाऊराव पाटील आण्णा असते तर स्त्रीवर अन्याय करणारांना काठीने झोडले असते. एखादी स्त्री आपल्या तत्वासाठी लढत असताना समाजाने सोबत असणे फार गरजेचे असते. आपला हा निकाल म्हणजे history झुंडीपुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे संविधनिक मूल्य जास्त महत्वाचे असल्याचे अधोरेखित करणारा आहे. कर्मवीर अण्णा यांची पुरोगामी संस्था अशावेळी माझ्या पाठीमागे उभी राहणे अपेक्षित असताना तसे घडले नाही, परंतु कुटुंबीय आणि लोकशाही विचारांच्या संघटना यांनी पाठबळ दिल्याने या दुर्दैवी प्रकारातून आम्ही बाहेर पडलो, असे प्रतिपादन सातारा येथील प्रा.डॉ.मृणालिनी आहेर यांनी केले.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या जगप्रसिद्ध ग्रंथाचा संदर्भ दिल्याने प्रा. डॉ.मृणालिनी आहेर यांची चौकशी करण्याचे पत्र महाविद्यालयाने पोलिसांना दिले होते. मात्र कोर्टाने आहेर यांच्या बाजूने निर्णय देत पोलिसांना म्हणजेच सहा.पोलिस निरीक्षक रमेश एस. गर्जे यास चांगलेच फटकारले आणि ‘शिवाजी कोण होता’ हा ग्रंथ वाचण्याचे सांगितले. सकल भारतीय समाज यांच्या वतीने प्रा.डॉ.मृणालिनी आहेर यांचा सत्कार आणि अनुभवकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर भारतीय महिला फेडरेशनच्या कॉ.स्मिता पानसरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डॉ.सुधाकर शेलार, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य प्रा.संदिप पालवे उपस्थित होते.
कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या, मृणालिनी आहेर यांनी आपल्या भूमिकेतून समाजाला आरसा दाखवण्याचे काम केले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त होणे सोपे आहे परंतु अनुयायी होणे सोपे नाही. यासाठी वाचन, तर्क आणि विचार करावा लागतो. सध्याच्या काळात लोकांना धर्मांध बनवण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे. परंतु प्रा. आहेर यांनी आपल्या कृतीने धर्मांध लोकांचा बुरखा फाडला आहे.
प्रा.सुधाकर शेलार म्हणाले, दिवसेंदिवस सामाजिक वातावरण भीषण होत चालले आहे. लोकांना बोलू दिले जात नाही. आताच्या शिक्षण व्यवस्थेतून बहुजनांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पूर्वीच्या काळात प्राचार्य, प्राध्यापक यांच्या नावाने महाविद्यालय ओळखले जात होते परंतु आता आमदार, खासदार यांच्या नावाने ओळखली जात आहेत. युजीसीने प्राचार्यांना धाकात ठेवणारी व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यपकांनी शिक्षण क्षेत्रातील कामासोबत समाजसुधारणेची भूमिका घेण्याची गरज आहे.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, शिवाजी भोर, कॉ.बन्सी सातपुते, आर्कि.अर्शद शेख, वहाब सय्यद, राजेंद्र कर्डिले, रवि सातपुते, अशोक भोसले, महादेव पालवे, लहु लोणकर, वैशाली बोलगे, महिंद्र देठे, विनोद शिंदे, अरुण पालवे, फिऱाेज शेख, भागचंद सातपुते, एल.बी.जाधव, प्रा.डॉ.सुरेखा गांगर्डे, अनिल आंबवडे आदी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संध्या मेढे, युनूस तांबटकर, इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, असिफखान दुलेखान, डॉ.प्रशांत शिंदे, अशोक सब्बन, शरद मेढे, विलास साठे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनाली देवढे-शिंदे यांनी प्रास्ताविक डॉ.महेबुब सय्यद यांनी तर आभार कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा