अहमदनगर | १५ ऑगस्ट | पंकज गुंदेचा
येथील रहेमत सुलतान फौंडेशनच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त ज्यांनी खरोखर स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले, देशासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून घेतली, शहीद झाले अशा वीरांना अभिवादन करण्यात आले. नाजिमा सय्यद, विद्या तनवर, प्रा.संगिता भांबळ, संध्या मेढे यांच्याहस्ते राष्ट्रगीतासह झेंडावंदन करून करण्यात आले. history रहेमत सुलतान फौंडेशनच्यावतीने गेल्या ९ वर्षांपासून अहमदनगरचे क्रांतिसिंह नाना तांबटकर यांच्या स्मरणार्थ सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येतो. यावेळी शहरातील अनेक महत्वाच्या व्यक्ती झेंडावंदनास आवर्जून उपस्थित रहातात.
यावेळी बोलताना रहेमत सुलतान फौंडेशनचे युनूस तांबटकर माहिती देताना सांगितले की, अहमदनगर शहरात एका सर्वसामान्य सुसंस्कृत कुटुंबात १९०७ साली जन्मलेले सुलतानभाई यांचे शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आवडीप्रमाणे व कलेप्रमाणे त्यांनी स्वतःचा मोठ्या भांड्याचा कारखाना हा व्यवसाय सुरू केला. रहेमतबी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना १३ मुले व मुली असा मोठा परिवार होता. शिस्तीला अतिशय कडक, परंतु प्रेमळ असे सुलतानभाई, शांततामय जीवन व सद्भावना, दुसऱ्याच्या धर्माचा आदर व स्वतःच्या धर्मावर प्रेम या तत्त्वावर ते नेहमी चालत.
ते पुढे म्हणाले, अतिशय कमी वयामध्येच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. त्यांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक डॉ.निसळ, एस.टी.महाले, मोतीलाल फिरोदिया यांच्यासोबत मिळून त्यांनी मोठे जनआंदोलन उभारले. आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारने अटक करून अहमदनगर येथील सबजेल व विसापुर जेलमध्ये तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यांचे सर्व मित्र त्यांना स्वातंत्र्यसेनानी ‘प्रतिसरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावावरून प्रेमाने “नाना” असे संबोधित. यानावामुळे बऱ्याच वेळेस ब्रिटिश पोलिसांमध्ये मुस्लिम असल्याची ओळख ही लपली जायची. याकाळात त्यांच्या कुटुंबीयांना घरातील कर्ता पुरुष जेलमध्ये असल्यामुळे सावेडीगावासमोरील तांबटकर मळा ही स्वमालकीची ९ एकर जागा सद्यस्थितीत प्रभात बेकरी यांना भाडेतत्त्वावर द्यावी लागली. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची फाळणी झाली. यावेळेस त्यांचे अनेक नातेवाईक हे पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी निघाले. त्यांनी नानांनाही आमच्या सोबत चला असे सांगितले परंतु नानांनी जमिनीवरची माती मुठीत उचलून आपल्या कपाळाला लावली. त्या सर्वांना कडकडून सांगितले की, मी याच मातीमध्ये जन्मलो व याच मातीमध्ये मरणार. माझे घर हेच आहे. मी माझे घर व भारत देश सोडून कुठेही जाणार नाही.
नानांना सात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येत होत्या. त्यांचे उर्दू वर खूप प्रेम होते. त्यांचे अनेक मित्र हे संघाचे, राष्ट्र दलाचे कार्यकर्ते होते, वेबल सर व बेडेकर सर यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे घनिष्ठ स्नेहभाव होता. ही सर्व मंडळी एकत्र बसल्यावर स्वातंत्र्यानंतरच्या भारताला व राज्यकर्त्यांना पाहून नेहमी आवर्जून एक शेर म्हणत…
“बर्बाद गुलिस्ता करने को, बस एक ही उल्लू काफी था..
हर शाक पे उल्लू बैठा है,
अंजामे गुलिस्ता क्या होगा “
महात्मा गांधी यांचा नानांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता. ते काँग्रेस पार्टीचे सक्रिय सदस्य होते. अनेक बैठकींना ते हजर राहून आपले परखड मत व विचार लोकांना पटवून देत. त्यांनी आयुष्यभर गांधीजींचे विचार पाळले, खादीचे कपडे वापरले. गांधीजीच्या हत्येनंतर तो दिवस ते नेहमीच संपूर्ण दिवस मौन पाळायचे व त्यावेळी त्यांच्या घरामध्ये चुल बंद असायची. गांधीजींची प्रार्थना “वैष्णव जन तो ” ते नेहमी ऐकताना सुत कातायचे व विणलेल्या सुताचे हार करून घरामध्ये आलेल्या पाहुण्यांच्या गळ्यात घालायचे. त्यांचे दुख:द निधन १९७२ साली झाले.
झेंडावंदनास शेख अबरार, कलीम शेख, जितु चव्हाण, प्रा.डॉ.महेबुब सय्यद, असिफखान दुलेखान, सईद खान, सय्यद रियाज, इंजी अभिजीत एकनाथ वाघ, राजु शेख, सय्यद आरीफ, दता वडवणीकर, संतोष गायकवाड, विजय केदारे, फिरोज शेख, सुदाम लगड, भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा