डोव्हर, इंग्लंड | प्रतिनिधी
sports मुळ पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या सहिष्णू जाधव या १६ वर्षीय मुलाने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा पराक्रम केला. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू हा अपवाद ठरला आहे. हा धाडसी जलतरणपटू ता. २९ जुलै २०२४ रोजी पुन्हा इंग्लिश खाडी पोहून पार करून गेला.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. शिवानंद जाधव यांनी सांगितले, गेल्या वर्षी सहिष्णूने सहा व्यक्तींच्या टीमसोबत १६ तासांच्या संघर्षानंतर इंग्रजी खाडी पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या टीमसोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे १५ तास ८ मिनिटांत हे अंतर पार केले. सहिष्णू हा दोन वेळा इंग्लिश खाडी पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ ६५ भारतीयांनी इंग्लिश खाडी पोहली आहे. उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे. त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे. सहिष्णू हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या गावाचा असून सध्या तो लंडनमध्ये आईवडिलांसोबत रहातो.
यावेळी बोलताना सहिष्णू म्हणाला, ओपन वॉटर स्विमिंग हा मुळातच अवघड क्रीडा प्रकार असून त्यात इंग्लिश खाडी ही तर अत्यंत खडतर अशा परीक्षेला सामोरे जायला लावणारी आहे. या पूर्ण प्रवासात मला माझ्या शारीरिक आणि मानसिक अश्या दोन्ही मर्यादा वाढवाव्या लागल्या. ज्या क्षणी मी त्या थंड चॅनलच्या पाण्यात उडी घेतली, तेव्हा ते एप्रिलमधील अचानक आलेल्या पावसासारखे धक्कादायक आणि तीव्र वाटले. प्रत्येक स्ट्रोक हा एक लढा होता. काही क्षण असे आले जेव्हा मला आपण समुद्राशी कबड्डीचा न संपणारा खेळ खेळत असल्यासारखे वाटले. समुद्र मला मागे खेचत होता तर मी स्वतःला पुढे ढकलत होतो.
सहिष्णूचा जलतरणातील प्रवास मागील वर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी सुरु झाला. टीमचे जलतरण ता. २९ जुलै रोजी पहाटे सुरु झाले. प्रवाह, तापमान बदल, आणि थकव्याच्या अडचणींना तोंड देत त्यांनी हा प्रवास संध्याकाळी पूर्ण केला. ता. २९ जुलैच्या जलतरणात खूप आव्हाने होती. शेवटच्या दोन तासांत सात फुटांच्या मोठ्या लाटा आणि प्रवाह होते, ज्यामुळे पायलटला जलतरण रद्द करावे लागेल अशी परिस्थिती शेवटच्या काही तासांमधे निर्माण झाली होती. प्रवाह, वारे, आणि मोठ्या लाटांमुळे मार्ग साधारणपणे इंग्रजी S आकाराचा असतो. हा प्रवास २१ मैलांचा होता, पण प्रवाह आणि उच्च लाटांमुळे २९.८ मैल म्हणजेच ४८ किमीचा झाला.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा