अहमदनगर | प्रतिनिधी
शहरातील अहमदनगर कॉलेजमध्ये आज पंधरा तारखेला राज्य सरकारकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहर आणि परिसरातील सुमारे एकवीस कंपन्या व काही संस्थांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. पावसाळा असल्याकारणाने ग्राउंडवर रोजगार मेळावा घेण्यापेक्षा प्रत्येक क्लासरूममध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या इंटरव्यू घेण्यात येत होत्या. नोकरीच्या शोधात आलेल्या अनेक उमेदवारांची पावसामुळे धांदल उडाली होती.
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार मेळाव्याला थंड प्रतिसाद मिळालेला असून नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणांचे मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याला गर्दी अजिबात आढळून आली नाही. मोजक्या कंपन्या आणि पावसाचे वातावरण त्यामुळे अत्यल्प स्वरूपात जमलेल्या उमेदवारांना देखील आज मोठा पाऊस सुरू असल्याकारणाने त्रास सहन करावा लागला.
नगर चौफेर प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळी रोजगार मेळाव्याला भेट दिली त्यावेळी रोजगार मेळाव्यात ऑफर करण्यात रोजगार हे बहुतांश आयटीआय, फिटर, ग्राइंडर तसेच लेबर स्वरूपाचे मोठ्या प्रमाणात होते. वरिष्ठ पदावरील नेमणुकीसाठी जागा कमी होत्या तर वरिष्ठ पदावरील नोकरीसाठी उमेदवार देखील दिसून आले नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असला तरी सरकारला सद्य परिस्थितीतील पावसाचा अंदाज नव्हता का ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.