धर्मवार्ता | टी.एन.परदेशी
हे दोन शंकराचार्य अंबानींच्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहिले. संन्याशांनी विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्यास काही शास्त्राधार आहे काय ?
मागील वर्षी एक शंकराचार्य आळंदीस आले असता संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या समाधी दर्शनास देवस्थान कमिटीने आमंत्रित करूनही गेले नाहीत. कारण काय तर शंकराचार्यांना अशा एखाद्या समाधीचे दर्शन घेणे निषिद्ध असते. बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद नुकतेच पुण्यास येऊन गेले. येथील मुक्कामात प्रथेनुसार त्यांचे पालखी व पाद्यपुजा असे मानपान सर्वत्र पार पडले.
त्याव्यतिरिक्त शंकराचार्य यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीसह पुण्यातील आणखी एका गणेशाचे चे दर्शन घेतले, शिवाय मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील गणेश स्थानांना भेट दिली. या प्रवासात शंकराचार्यांना रस्त्याने ज्ञानेश्वर तुकाराम व विठ्ठलाचा नामगजर करत चालणारे हजारो वारकरी व दिंड्या दिसल्या असतील. शंकराचार्यांनी या वारकऱ्यांशी संवाद साधायला हवा होता, दिंडीतील पादुकांचे दर्शन घ्यायला पाहिजे होते इतकेच काय पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन ही घ्यायला पाहिजे होते.
शंकराचार्यांनी हे केले नाही व ते जाणीवपूर्वक टाळले असे म्हटले पाहिजे.
ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घ्यायचे नाही, वारकरी व दिंडी सोहळ्याचे दुर्लक्ष करायचे, विठ्ठल दर्शन ही टाळायचे हे कशाचे लक्षण आहे? बहुजनांचा देव नको, बहुजनांच्या परंपरा नकोत. वारकरी जनांना टाळकुटे म्हणून त्यांची संभावना करणारी ही वृत्ती आहे. विठ्ठलाला टाळणारे हे धर्ममार्तंड अंबानीच्या विवाहात मात्र राहतात हा केवढा विरोधाभास !