ज्येष्ठ कादंबरीकार सुरेश पाटील यांना ‘स्व. राजीव राजळे स्मृति राज्यस्तरीय साहित्य साधना जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

अहमदनगर | प्रतिनिधी

पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ‘स्व. राजीव राजळे स्मृति राज्यस्तरीय साहित्य साधना जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ कादंबरीकार सुरेश पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून मान्यवर साहित्यिक व साहित्यरसिकांशी संवाद साधला. स्व. राजीव राजळेंच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला.

आमदार मोनिका राजळे यावेळी म्हणाल्या, स्व. राजीवजींचे अगाध साहित्यप्रेम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. आजही आपणासारख्या स्नेहीजनांच्या रूपाने त्यांच्या साहित्यसाधनेला वेळोवेळी उजाळा मिळत असतो. ही परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न मी प्रतिवर्षी ‘राजीव बुक फेस्ट’च्या माध्यमातून करते. स्व. राजीवजींची साहित्ययात्रा पुढे नेण्याचा प्रयत्न करते. शेवटी आपण स्मृती जपायच्या. कार्य पुढे न्यायचं. जीवनातील अनेक वळणांवर अनेक गोष्टींचा, कार्याचा वारसा जपणे, हेच आपल्या हाती असते.
या पुस्तक रूपाने आजही ते आपल्या सर्वांच्यात आहेत. ही साहित्य चळवळ वृद्धिंगत होताना, वाढताना पाहून त्यांना निश्चितच आनंद होत असेल. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांना धन्यवाद देते,” अशा भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रभरातील मान्यवर साहित्यिकांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. कादंबरी, कथा व कविता, आत्मचरित्र, विशेष चरित्र, संकीर्ण, साहित्य जीवन गौरव, प्रकाशित पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण या प्रसंगी करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते झाले. सुनिताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक आमदार लहु कानडे, माजी आमदार सत्यजित तांबे, आ. संग्राम जगताप, हमाल पंचायते अविनाश घुले यांच्यासह अनेक मान्यवर, ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी व साहित्य रसिकांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *