जामखेड | रिजवान शेख |२६.६.२०२४
गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीचे ४४ कोटी रूपये जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
मागील वर्षी हवामान बदलामुळे आणि पीक काढणीच्या वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पिकविमा भरण्यासाठी राज्य सरकारने १ रुपयात पिकविमा भऱण्याची योजना आणली परंतु विमा भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामळे रोहित पवार यांनी त्यांची यत्रंणा प्रत्येक गावांमध्ये राबवून या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पिकविमा उतरवणारे सर्वाधिक शेतकरी हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील होते. पिकविम्याचे फॉर्म भरून घेतल्यानंतर खरीप हंगामात अनेक पिकांचं नुकसान झाले तसेच पिक काढणी पश्चात झालेल्या नुकसान भरपाईचीही शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन आणि विमा कंपन्यांकडे नियमित पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि अखेर जामखेड तालुक्यासाठी ४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरु असून पुढच्या दहा दिवसात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सध्या खरीप पिक हंगामात पेरणी सुरु असून हे पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी या पैसाचा उपयोग होईल. जेव्हा आमदार रोहित पवार हे लोकसभेच्या प्रचारासाठी फिरत होते तेव्हा शेतकऱ्यांनी २०१८-१९ च्या पिकविमा संदर्भात त्यांना सांगितले होते. आमदार झाल्यानंतर लगेचच रोहित पवार यांनी शासनाकडे नियमित पाठपुरावा केला, त्यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठाका घेतल्या, अधिवेशनावेळी देखील त्यांनी कृषीमंत्री व वित्तमंत्री यांच्याशी याबाबत वारंवार संवाद साधला होता आणि त्यामुळे तेव्हा कर्जत-जामखेड व अहमदनगर जिल्ह्याचे मिळून १९० कोटी शेतकऱ्यांना मिळाले होते.
सरकार मार्फत पिकविमा उतरवला जातो परंतु नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अनेक अडचणी येतात. यासंदर्भात मी अधिवेशनामध्ये व व्यक्तीशः अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी बँकेत जाऊन आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत चौकशी करावी आणि काही अडचण असल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.