मुंबई |प्रतिनिधि | २५.६.२०२४
महाराष्ट्र राज्यात वारंवार होणारी पेपरफुटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीत सुरु असलेला गैरव्यवहार या प्रश्नांचा आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा करुनही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी आता थेट राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे तक्रार केलेली आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, सरकार दुर्लक्ष करत असेल तर अशा वेळी राज्यपालांकडे जाऊन दाद मागता येते. त्यानुसार झोपलेल्या या सरकारला जागे करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपरफुटी विरोधात येत्या अधिवेशनात कठोर कायदा करण्याबाबत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदभरतीत सुरु असलेला गैरप्रकार आणि विद्यापीठात वारंवार निर्माण होत असलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती रोखण्याबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश सरकारला देण्याची विनंती महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना भेटून केली आणि याबाबतचे पत्र त्यांना दिले. राज्यपाल महोदयांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रवक्ते विकास लवांडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र राजापूरकर आणि विद्यार्थी आघाडीचे सुनिल गव्हाणे आदी उपस्थित होते.