शेवगांव-पाथर्डी मतदारसंघात दोन्ही घरचा पाहुणा राहिला अर्धपोटी - Rayat Samachar

शेवगांव-पाथर्डी मतदारसंघात दोन्ही घरचा पाहुणा राहिला अर्धपोटी

रयत समाचार वृत्तसेवा
5 Min Read

ग्यानबाची मेख  २१.६.२०२४

पाथर्डी | राजेंद्र देवढे 

    नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शेवगांव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना ७७४१ मतांचं मताधिक्य मिळालं. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना तब्बल ६०, ६९८ मतांचं मताधिक्य मिळालं होतं. म्हणजेच या निवडणुकीत त्यांची ५२, ९५७ मतं कमी झाली. याचाच अर्थ त्यांना गेल्या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य कायम राखता आलं असतं तरी ते ३१, ७६९ मतांच्या फरकाने विजयी झाले असते. जरी गेल्या निवडणुकीत वातावरण वेगळं असलं तरी यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिल्यामुळे, ती, त्यांच्या जमेची बाजू होती. कारण, या मतदारसंघात घुले पाटील यांच्याकडं स्वतःची तितकी मतं नक्कीच आहेत. तरीही या निवडणुकीत, डॉ. सुजय विखे पाटील यांना केवळ ७७४१ मतांचं मिळालेलं मताधिक्य त्यांना नक्कीच आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं. अर्थात-ते त्यांनी करायलाच हवं ! किंबहुना त्यांनी ते केलंही असावं. परंतु, वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करायचं ठरलंच तर त्यासाठी त्यांचं अवलोकनही तितकंच वस्तुनिष्ठ असायला हवं. ते जर आत्मनिष्ठ असेल तर मात्र त्यांना, त्याची खरी कारणं कळणं केवळ दुरापास्तच असेल. कारण, कुणाही व्यक्तीचं किंवा व्यक्तिविशेषाचं अवलोकनच जर चुकीचं असेल तर त्याला होणारं ज्ञानही चुकीचंच असतं. हा केवळ तर्कशास्त्राचा नव्हे तर भौतिकशास्त्राचा नियम आहे.

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीला, पुलवामा व बालाकोटची पार्श्वभूमी होती. त्या निवडणुकीत, घुले पाटील परिवार हा तत्कालिन एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी होता. अर्थात-त्यावेळी त्यांनी अंग चोरल्याच्या वावड्या उठल्या असल्या तरी यावेळी ते अंग झटकून डॉ. विखे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. याउलट, गेल्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे या भाजपाच्या एकमेव लोकप्रतिनिधी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या होत्या. मग यावेळी त्यांच्या जोडीला माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील असूनही असं काय झालं असावं की, ज्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मताधिक्यात प्रचंड घसरण झाली ? याचं उत्तर याच प्रश्नात दडलेलं आहे. कुठल्याही घटनेची कारणमिमांसा करायची ठरली तर त्या घटनेचं उत्तर इतरत्र नव्हे तर तिच्याच पोटात दडलेलं असतं. सामान्य माणसं अशा घटनेची उत्तरं इतरत्र शोधतात. कारण, त्यांना हे शास्त्र अवगत नसतं. परंतु, डॉ. सुजय विखे पाटील हे असामान्य घराण्यातील असल्याने ते याच नियमानुसार त्यांच्या घटलेल्या मताधिक्याची मीमांसा करतील असं समजायला हरकत नाही. याचा अर्थ भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यापैकी कुणी दगाफटका केला असा होत नाही व तसं काही दर्शविण्याचा हेतूही नाही. प्रश्न फक्त वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण व आकलनाचा आहे.

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीचं मंथन केलं असता, त्यातून एकच निष्कर्ष समोर येतो-तो म्हणजे, डॉ. सुजय विखे पाटील यांनी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केलेली वातावरणनिर्मिती आणि त्यानंतर त्यांनी केलेला भाजपप्रवेश व पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या भावनेमुळे त्यांना प्रचंड मताधिक्य मिळालं होतं. या निवडणुकीत मात्र तसं काही नसलं तरी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी, डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं पारडं या मतदारसंघात जड मानलं जात होतं. त्यामुळे, या मतदारसंघातून डॉ. विखे पाटील यांना गेल्या निवडणुकीतील मताधिक्यापेक्षाही जास्त मताधिक्य मिळेल, असा राजकीय धुरीणांचा कयास होता. डॉ. विखे पाटील यांनीही कदाचित तेच गृहीत धरलं असावं. परंतु, तसं काही झालं नाही. जरी कोंडाळ्यातील काही कार्यकर्त्यांसह या मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या स्वीय सहायकांवर सर्वसामान्य मतदारांत प्रचंड नाराजी व चीड असली तरी एवढी मोठी पीछेहाट अपेक्षीत नव्हती. केंद्र व राज्य सरकारांवर लोकांच्या मनात खदखद असली तरीही, विखे पॅटर्न चालणारंच असं शेवटपर्यंत वाटत होतं. परंतु, जेव्हा निकाल लागला तेव्हा दोन आजी माजी आमदार दिमतीला असूनही डॉ. विखे पाटील यांच्या मताधिक्यात वाढ होण्याऐवजी प्रचंड घट झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

   ज्या पद्धतीनं साम, दाम, दंड व भेद या हमखास यश मिळवून देणाऱ्या चतुःसूत्रीचा वापर झाला ते पाहता डॉ. विखे पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळेल अशी सर्वांचीच धारणा होती.

डॉ. विखे पाटील यांच्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश लंके यांच्याकडे अगदी नगण्य साधनं होती. तरीही, त्यांनी डॉ. विखे पाटील यांना गेल्या वेळी मिळालेल्या मताधिक्याचा खड्डा भरून काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे एकमेव शिलेदार प्रताप ढाकणे यांच्या एकट्याच्या हाती निलेश लंके यांच्या प्रचाराची धुरा असल्याने तिच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसूत्रीपणा होता. त्याच्यात कुठलाही अभिनिवेश नव्हता तर समर्पणाची भावना होती. तीच कार्यकर्त्यांत उतरल्यामुळे अतिशय परिणामकारक ठरली. परिणामी त्यांचे व शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते लंके यांच्या प्रचारात हिरीरीने उतरले. त्यांचा प्रचार एकचालकानुवर्ती असल्याने त्यात शिस्त होती. विखे पॅटर्नच्या तुलनेत त्यांच्या हातात कमी संसाधने असली तरी त्यांच्यात जिद्द व चिकाटी होती. त्यामुळे, ते जिंकण्याच्या दृष्टीने अखेरपर्यंत प्रयत्न करत राहिले. याउलट डॉ. विखे पाटील यांच्या यंत्रणेसह दोन दोन आजी माजी आमदार असल्याने त्यांच्या प्रचारात विस्कळीतपणा आला. याला वाटलं तो पाहिल तर त्याला वाटलं हा पाहिल. परिणामी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहिला नसला तरी भरपेट न जेवता अर्धपोटीच राहिला.

Share This Article
Leave a comment