समाजसंवाद २०.६.२०२४
वसई विरारमध्ये चालले काय आहे? दररोज नवनवीन गुन्हे समोर येत आहेत. तलाठी प्रकरण, ३ बहिणींवर लैंगिक अत्याचार, वेश्या प्रकरण आणि आता प्रेयसीला मारून प्रियकर शांतपणे बसुन राहतो काय, हे सर्व काय चालले आहे?
पालघर जिल्ह्यातील वाढते गुन्हे, अत्याचार हे सर्व लक्षात घेता हवा तसा न्याय न मिळण्याच्या तक्रारी सुद्धा दिसून येत आहेत. २ दिवसांपूर्वी बोईसर येथे एका मुलीच्या डोक्यात दगड मारण्यात आला. वसई येथे ३ बहिणींवर लैंगिक अत्याचार होत होता आणि बाप दारूत लोळत होता आणि आता हा नवीन प्रकार प्रेयसीला मारून तिच्या बाजूला बसून राहणे. तर लोकं चक्क व्हिडीओ, फोटो काढून व्हायरल करत आहेत पण कुणी मदतीसाठी पुढे सरसावले नाही. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे.
हे सर्व रोजचेच झाले आहे. रोज असे प्रकार कानाकोपऱ्यात घडत आहेत. काहींची माहिती मिळते तर काहींची मिळत नाही. पण ज्यांची माहिती मिळते त्या गुन्हेगाराचे पुढे काय होते? किती शिक्षा मिळते? आणि त्यातून सामान्य लोकांना काय बोध मिळतो? हे अजूनही सिद्ध झाले नाही कारण गुन्ह्यांचे प्रमाण अजूनही वाढत आहे. वसईतील लैंगिक प्रकरणातील आरोपी तलाठी विलास करे ह्यांसारखे कितीतरी सैतानी वृत्तीची माणसे आजूबाजूला आहेत.
कृपया पोलीस साहेबांनो, अधिकारी वर्गांनो, आमदार, जिल्हाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनो, हे वसई विरारमध्ये चाललेल्या प्रकाराला आळा बसवण्यासाठी कसून प्रयत्न करा. आपणास जनतेच्या हितासाठी आपल्याला निवडले आहे ह्याची जाणीव ठेवून अश्या आरोपीला कवेत न घेता किंवा लाच न घेता इमानदारीने कार्य करा. नक्कीच समाज आणि लोकं तुम्हाला उचलून घेतील, अन्यथा आपल्याबद्दल वाईट चर्चेला उधाण येईल.
आज हे सर्व गुन्ह्यांचे प्रकार जास्त करून ईस्ट (पूर्वेला) होत आहेत पण हळूहळू वेस्ट (पश्चिम) साईटला आणि आमच्या गावातही असे प्रकार घडू शकतील. तलाठी प्रकाराने ही सुरवात झाली आहे. परप्रांतीय लोकांचा वाढता जमाव, अशिक्षित, गरिबी, आणि वाईट नजर ह्या सर्व गोष्टीमुळे हे प्रकार वाढत आहेत. मुली, स्त्रीया किती सुरक्षित आहेत, हे ह्या सर्वांवरून समजते.
ज्यांना स्वरक्षण करता येते ती स्त्री स्वतःचे रक्षण करील, पण अबाल मुली त्यांचे काय? त्यांसाठी सजग समाज आणि पोलीसांची गरज आहे. पण तेच जर फोटो काढण्यात आणि आपली रक्षा करण्यात कमी पडत असतील तर काय करावे हा आता समोर प्रश्न आहे.
– मेल्सीना तुस्कानो परेरा,
विरार.