इतिहासवार्ता | १३.७ | इंजि. अभिजीत वाघ
ऐतिहासिक अहमदनगरच्या (आताचे अहिल्यानगर) इतिहासात १३ जुलै १६०० हा दिवस एका निर्णायक वळणाचा साक्षीदार ठरला. निजामशाहीच्या पराक्रमी शासिका सुलताना चांदबीबी (Chand Bibi Ahmednagar) यांच्या हत्येनंतर अखेर अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. अनेक दिवसांच्या भीषण संघर्षानंतर युद्ध संपले; मात्र रणांगणावर पडलेल्या शेकडो मृतदेहांनी त्या विजयालाही दु:खाची किनार दिली होती
(Chand Bibi Ahmednagar) किल्ला जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सम्राट अकबराचा पुत्र राजपुत्र दानियल याने भुईकोट किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याची पाहणी करताना तो मछली बावडी परिसरात गेला. तेथे त्याच्या नजरेस रत्नजडित सॅंडल पडलेले दिसले. परिसरात मृतदेहांचा खच पडलेला होता. युद्ध संपले असले तरी अनेकांचे अंत्यसंस्कार झाले नव्हते.
ही परिस्थिती पाहून राजपुत्र दानियल यांनी बहादुरशाह यांना मछली बावडी व हौदातील सर्व मृतदेह सन्मानपूर्वक बाहेर काढण्याचे आदेश दिले. या मृतदेहांमध्ये सुलताना चांदबीबी (Chand Bibi Ahmednagar) यांचेही पार्थिव होते. मात्र, त्या काळातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य विटंबनेचा धोका लक्षात घेऊन बहादुरशाह यांनी ते पार्थिव चांदबीबी यांच्या एका मैत्रिणीचे असल्याचे सांगितल्याचा उल्लेख तारिख-ए-अहमदनगरमध्ये आढळतो.
राजपुत्र दानियल यांनी त्यानंतर युद्धात मृत्यू पावलेल्या सर्व व्यक्तींना कोणताही भेदभाव न करता सन्मानाने दफन करण्याचे आदेश दिले. विजयी सैन्याच्या सेनापतीने पराभूत शत्रूच्या सैनिकांनाही आणि राजघराण्यातील व्यक्तींनाही समान आदराने अंतिम निरोप देण्याचा घेतलेला हा निर्णय इतिहासातील माणुसकीचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानला जातो.
बहादुरशाह यांनी चांदबीबी यांच्या मैत्रिणींची पार्थिवे पश्चिम दिशेला दफन करून त्या ठिकाणी मोठा चौथरा उभारला. तर सुलताना चांदबीबी यांचे पार्थिव बागरोजा येथे स्वतंत्र चबुतरा बांधून सन्मानपूर्वक दफन करण्यात आले.
नवाबअली वजीर आणि चिताखान यांची पार्थिवेही बाहेर काढून बागरोजासमोर दफन करण्यात आली. युद्धात प्राणार्पण केलेल्या इतर हबशी सैनिकांची पार्थिवे सोहेलखान मशिदीजवळ धार्मिक विधीनुसार आणि पूर्ण सन्मानाने दफन करण्यात आली.
या अंत्यसंस्कारांनंतर संपूर्ण अहमदनगर शहर आणि भुईकोट किल्ला तब्बल पाच दिवस शोकमग्न होता. विजयाचा उत्सव साजरा करण्याऐवजी मृतांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली गेली. युद्धाच्या राखेतून उगवलेली ही माणुसकी आजही इतिहासाच्या पानांवर जिवंत आहे.
विशेष म्हणजे, या घटनांशी संबंधित कबरी, दफनस्थळे आणि ऐतिहासिक पुराव्यांचा शोध अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ यांच्या संशोधनातून लागला आहे. या संशोधनात आसिफखान दूलेखान, इंजि. अभिजीत वाघ, भैरवनाथ वाकळे आदी इतिहास संशोधकांचा सहभाग आहे. या विषयावरील अधिक सविस्तर माहिती असलेली पुस्तिका लवकरच प्रकाशित होणार असून, अहमदनगरच्या इतिहासातील या महत्त्वपूर्ण अध्यायावर नव्याने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यातून केला जाणार आहे.
इतिहास हा केवळ युद्धांचा, विजयांचा किंवा सत्ताबदलांचा नसतो; तो मानवी मूल्यांचाही असतो. १३ जुलै १६०० रोजी अहमदनगरमध्ये घडलेली ही घटना याच सत्याची साक्ष देते. युद्ध संपले होते, सत्ता बदलली होती; पण माणुसकी जिवंत होती. म्हणूनच हा दिवस केवळ एका युद्धाच्या समाप्तीचा नव्हे, तर ‘मानवतेच्या विजयाचा दिवस’ म्हणून स्मरणात राहतो.
संदर्भ : तारिख-ए-अहमदनगर, हिंदी अनुवाद : सय्यद सैफअली सफउद्दीन सर.
History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



