मुंबई | ११.६ | रयत समाचार
(Maharashtra) माथाडी मंडळ आणि सुरक्षा रक्षक मंडळांच्या पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आता १८ जून २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत वाढविण्यात आली.
(Maharashtra) महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ तसेच महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध मंडळांमधील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीअंतर्गत २२ माथाडी मंडळे आणि १२ सुरक्षा रक्षक मंडळांतील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या गट-क संवर्गातील पदांसाठी १३ मे २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
(Maharashtra) भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ जून २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत होती. अर्ज यशस्वीपणे सादर केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुरुवातीला १२ जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, शुल्क भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, ११ जून २०२६ पर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांना केवळ परीक्षा शुल्क भरण्यासाठी १८ जून २०२६ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नवीन अर्ज स्वीकारले जाणार नसून ही सुविधा फक्त आधीच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसाठी लागू राहणार आहे, अशी माहिती सहआयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी दिली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



