अहमदनगर | २८.५ | रयत समाचार
(India news) बकरी ईद, मुस्लिम समाज आणि गाय या विषयांभोवती राज्यभरात वेगवेगळ्या चर्चा आणि प्रशासकीय हालचाली सुरू असताना, अहिल्यानगरमध्ये मात्र ईदच्या दिवशी एक वेगळाच उपक्रम लक्ष वेधून घेणारा ठरला. बकरी ईदची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजातील युवकांनी थेट गोशाळेत जाऊन गाईंना चारा खाऊ घालत सामाजिक सलोखा आणि संवेदनशीलतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
(India news) कुष्ठधाम रोडवरील सतनाम साक्षी गोशाळेत ‘आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन’च्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मौलाना शफिक कासमी, नगरसेवक हाजी शैबाज, शैबाज बॉक्सर, शहानवाज शेख, फिरोज पठाण, फिरोज आर्किटेक, तनवीर तांबोळी, आयान शेख, मुजम्मिल शेख, शाहिद मोमीन, जीशान शेख, साहिल सय्यद यांच्यासह गोशाळेचे सचिव सीए शंकर अंदानी, मुकेश माधवाणी आणि अनेक युवक उपस्थित होते.
(India news) यावर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या वातावरणात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला. अशा प्रकारचे कार्यक्रम हे अनेकदा ‘इव्हेंट’ म्हणून पाहिले जात असले तरी सध्याच्या काळात सामाजिक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अशा उपक्रमांची गरज भासत असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले.
भारत हा कृषीप्रधान देश असून गाईला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीला बळ देण्यासाठी ईदच्या दिवशी गोशाळेत चारा वाटप करण्यात आल्याचे साहेबान जहागीरदार यांनी सांगितले.
राज्य सरकारने लागू केलेल्या गोहत्या बंदीच्या नियमांचे पालन मुस्लिम समाज पूर्ण जबाबदारीने करत आहे. संपूर्ण देशभरात मुस्लिम समाजाने गावंश जनावरांची कुर्बानी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गाय ही हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असून कृषी संस्कृतीचेही प्रतीक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचा गंभीरपणे विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
एरवी बकरी ईद आणि गाय या विषयांभोवती निर्माण होणाऱ्या वादग्रस्त चर्चांपेक्षा सामाजिक सलोखा आणि संवादाचा संदेश देणारा हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
