मुंबई | २२.४ | रयत समाचार
(Politics) दक्षिण मुंबईत काढण्यात आलेल्या भाजपच्या मोर्चावरून वाद अधिकच तीव्र होत असून, या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) मुंबईचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी राज्य सरकार व पोलिस प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केला. रा.स्व.संघ भाजपाचे गिरीश महाजन यांनी मोर्चाला अधिकृत परवानगी मिळाल्याचा दावा केला असला, तरी ही परवानगी कशी दिली गेली, यावर रेड्डी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
(Politics) कॉम्रेड रेड्डी म्हणाले, दक्षिण मुंबईमध्ये मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितल्यास पोलिसांकडून स्पष्टपणे नकार दिला जातो. कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यास सांगितले जाते. मग हीच नियमावली भाजपला लागू होत नाही काय? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
(Politics) डाव्या पक्षांना आणि कामगार संघटनांना वारंवार परवानगी नाकारली जाते, मात्र सत्ताधारी भाजपच्या मोर्चाला परवानगी कशी मिळाली, असा सवाल करत त्यांनी कायद्याच्या समानतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘कायद्यापुढे सर्व समान आहेत का, की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत?’ असेही त्यांनी विचारले.

तसेच, परवानगी दिली असली तरी ती सशर्त असते आणि वाहतूक विस्कळीत होणार नाही, अशी अट नेहमी घालण्यात येते. मात्र, भाजपच्या मोर्च्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली, नागरिकांना त्रास सहन करावा लागला, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप रेड्डी यांनी केला.
परवानगी दिली असेल तर त्याचे निकष काय होते? आणि अटींचे उल्लंघन करूनही संबंधितांवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत? असा सवाल करत त्यांनी पोलिसांनी याबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.
या प्रकरणामुळे प्रशासनाची भूमिका, कायद्याची अंमलबजावणी आणि सत्ताधाऱ्यांना मिळणारी सवलत यावर पुन्हा एकदा चर्चेची ठिणगी पडली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


