सांगली | ७.४ | रयत समाचार
(India news) येथील लोकसभेचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांची भेट घेऊन व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती कार्टूनिस्ट कंबाइन ट्रस्ट (महाराष्ट्र)चे संपर्क प्रमुख तसेच व्यंगचित्रकार रोहित कबाडे यांनी दिली.
(India news) अधिक माहिती देताना रोहित कबाडे म्हणाले, सध्या सोशल मीडियावर वाढत्या सेन्सॉरशिपमुळे व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येत आहेत. विशेषतः Instagram, Twitter (X) आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्यंगचित्रकारांची पोस्ट हटविण्यात येत असून काहींची अकाउंट्सही निलंबित करण्यात आली आहेत.
(Indian news) या पार्श्वभूमीवर कार्टूनिस्ट कंबाइन ट्रस्टच्या वतीने खासदार विशालदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न संसदेत मांडून त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खासदार पाटील यांनीही या विषयाची गांभीर्याने दखल घेत योग्य पातळीवर आवाज उठविण्याचे आश्वासन दिल्याचे कबाडे यांनी सांगितले.
व्यंगचित्र हे समाजातील वास्तवावर भाष्य करणारे प्रभावी माध्यम मानले जाते. मात्र वाढत्या डिजिटल सेन्सॉरशिपमुळे या अभिव्यक्तीवर बंधने येत असल्याने व्यंगचित्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता या प्रश्नावर संसदेत किती प्रभावी चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


