T20 | समीर रिझवीचा झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २.४ | गुरुदत्त वाकदेकर

भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधील पाचव्या टी-२० सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १४२ धावांचे लक्ष्य दिल्लीने १७.१ षटकांत १४५/४ असे गाठत १७ चेंडू राखून सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला समीर रिझवी, ज्याने ४७ चेंडूत नाबाद ७० धावा करत संकटातून संघाला सावरले.

लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत १८.४ षटकांत १४१ धावांत सर्वबाद अशी मजल मारली. मिचेल मार्शने २८ चेंडूत ३५ धावा, अब्दुल समदने २५ चेंडूत ३६ धावा, तर मुकुल चौधरीने ११ चेंडूत १४ धावा करत काहीसा प्रतिकार केला. कर्णधार ऋषभ पंत ९ चेंडूत ७, एडन मार्करम ८ चेंडूत ११, निकोलस पूरन ८, आणि आयुष बदोनी शून्यावर बाद झाल्याने डावाला मोठी उंची मिळाली नाही. शाहबाज अहमद १६ चेंडूत १५ धावांवर नाबाद राहिला. अतिरिक्त १४ धावाही लखनौसाठी उपयोगी पडल्या.

दिल्लीच्या गोलंदाजीत लुंगी एन्गिडीने ३.४ षटकांत २७ धावा देत ३ विकेट्स, टी. नटराजनने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स, तर कुलदीप यादवने २/३१ अशी कामगिरी केली. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनीही अचूक साथ दिली.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. के. एल. राहुल पहिल्याच चेंडूवर शून्यावर, पथुम निसांका ५ चेंडूत १, नितीश राणा १७ चेंडूत १५, तर कर्णधार अक्षर पटेलही शून्यावर बाद झाला. अवघ्या ४.३ षटकांत २६/४ अशी अवस्था झाल्याने सामना लखनौच्या बाजूला झुकला होता.

याच वेळी समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संयमाने डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ११९ धावांची विक्रमी भागीदारी रचत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. रिझवीने ४७ चेंडूत नाबाद ७० धावा करत ५ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. ट्रिस्टन स्टब्स ३२ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला.

सामन्यानंतर समीर रिझवी म्हणाला, “क्रमांक चारवर खेळण्याचा आत्मविश्वास प्रशिक्षकांनी दिला. लखनौ माझे घरचे मैदान असल्याने खेळपट्टीची चांगली जाण होती. विकेट्स झटपट पडल्याने योजना बदलावी लागली, पण खराब चेंडूंना शिक्षा करण्याचे ठरवले होते.”

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, नव्या चेंडूला स्विंग मिळत असल्याचे स्पष्ट दिसत होते. एक मोठी भागीदारी झाली तर सामना आपल्या बाजूला येईल, याची खात्री होती. समीरने नेटमध्ये खूप मेहनत घेतली असून त्याचे फळ आज दिसले.

लखनौचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, १४० ही धावसंख्या या विकेटवर आव्हानात्मक नव्हती. सुरुवातीला गोलंदाजांनी उत्तम काम केले, पण अतिरिक्त धावा आणि पाचव्या गोलंदाजाचा अभाव निर्णायक ठरला.

या सामन्यात काही मोठे विक्रम नोंदले गेले. समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांची पाचव्या विकेटसाठी नाबाद ११९ धावांची भागीदारी ही दिल्ली कॅपिटल्सची पाचव्या विकेटसाठी आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली. लखनौविरुद्धही हा पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठा विक्रम ठरला. समीर रिझवीचा ७० हा आयपीएल २०२६ मधील सर्वोत्कृष्ट दबावाखालील डावांपैकी एक मानला जात आहे.

या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील पहिला विजय नोंदवत गुणतालिकेत मजबूत पाऊल टाकले, तर लखनौला चांगली सुरुवात करूनही पराभवाचा धक्का बसला.

उद्या स्पर्धेतील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता येथे सायंकाळी ७:३० वाजता रंगणार आहे. दोनही संघांना पहिल्या विजयाची गरज असल्याने हा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading