समाजसंवाद | १.४ | सुभाष वारे
(History) भारतातील लोकशाही समाजवादी चळवळीला वैचारिक स्पष्टता आणि संघटनात्मक मजबूती देण्यासाठी सतत कार्यरत राहिलेले जे मोजके नेते होते, त्यात साथी एस.एम. जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. १७ मे १९३४ रोजी भारतात काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहेरअली, कमलादेवी चटोपाध्याय, जयप्रकाश नारायण, डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या सोबत एस.एम. जोशी यांचाही त्यात पुढाकार होता.
(History) म. गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या सर्व सभासदांचा सक्रीय सहभाग होता. एस.एम. जोशी यांच्याही सार्वजनिक कार्याची सुरुवात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सहभागानेच झाली. सुरुवातीच्या काळात युसुफ मेहेरअली यांचेसोबत ‘युथ लीगमधे’ एस.एम. सक्रीय होते. हे तेच युसुफ मेहेरअली ज्यांनी १९४२ च्या लढ्याला ‘क्वीट इंडिया’ म्हणजेच ‘छोडो भारत’ हे नाव देण्याची सूचना म. गांधींजींच्याकडे केली होती. एस.एम. जोशींचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभिमानास्पद आहे.
(History) आंदोलनातील सहभागामुळे त्यांना जवळपास सात वर्षे ब्रिटीशांच्या तुरुंगात काढावे लागले. या सात वर्षांपैकी निम्म्याच्या आसपास कालावधीत एस.एम. यांनी सक्तमजुरीची शिक्षा भोगलेली आहे. छोडो भारत आंदोलनात सुरुवातीची काही वर्षे ते भुमीगत राहून ब्रिटीश सरकारविरोधी जनमत बनवण्यासाठी प्रभावी काम करत होते. ओळखले जावू नयेत म्हणून त्याकाळात अनेक महिने ते इमामअलीच्या वेषात फिरत होते. अनेक महिने इमामअलीच्या वेषात फिरल्याने मुस्लीम समाजाचा स्वतःकडे बघण्याचा आणि मुस्लीमेतर समाजघटकांचा मुस्लीम समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन समजण्यास मला मदत झाली, असे एस.एम. यांनी नंतर नोंदवून ठेवले.
राष्ट्र सेवा दलाचे पहिले दलप्रमुख : त्याचदरम्यान तरुणाईला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्याची प्रेरणा मिळावी तसेच सामाजिक व आर्थिक विषमतेच्या बाबतीत तरुणाई सजग आणि सक्रीय व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख समाजवादी नेत्यांनी आपापसात विचारविनिमय करुन ‘राष्ट्र सेवा दल’ या समाजवादी युवक संघटनेची स्थापना केली. त्याचवेळी या संघटनेच नेतृत्व एस.एम. जोशी यांनी करावे, असे सर्वांचे मत झाले आणि एस.एम. राष्ट्र सेवा दलाचे पहिले दलप्रमुख झाले.
एस.एम. यांनी सुरुवातीपासूनच राष्ट्र सेवा दलास प्रभावी नेतृत्व दिले. १९४१ मधे स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांनी बेचाळीसच्या ‘चले जाव’ आंदोलनात अतुलनीय सहभाग नोंदविला. अनेक राष्ट्र सेवा दल सैनिक भुमिगत राहून ब्रिटीश प्रशासनाची झोप उडवणारे काम करत होते. अनेकांना तुरुंगवास सहन करावा लागला. अनेकजण शहीद झाले. नंदुरबार येथील हुतात्मा शिरीषकुमार हा राष्ट्र सेवा दलाचा सैनिक होता.
पश्चिम महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘तुफान सेना’ स्थापन झाली होती. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड, धोंडीराम माळी अशा अनेकांच्या सहभागातून तत्कालीन सातारा जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन करुन ब्रिटीश प्रशासनाचा पाया खिळखिळा केला होता. राष्ट्र सेवा दलाच्या शिबीरातील सहभागामुळेच आम्हाला तुफान सेना स्थापन करण्याची कल्पना सुचली, असे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी म्हणायचे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाला अपेक्षित नव्या भारताच्या निर्मीतीसाठी भारतीय जनमाणसाची मशागत करण्याचे काम एस.एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र सेवा दल सैनिकांनी केले. सरकारची धोरणे सामान्य जनतेच्या हिताची असावीत यासाठी शांततामय मार्गाने जनमताचा दबाव निर्माण करणारे अनेक जनआंदोलक, ग्रामीण भागाच्या समृध्दीसाठी रचनात्मक काम उभे करणारे अनेक जीवनदानी कार्यकर्ते, संविधानाला अपेक्षित जागरुक आणि संवेदनशील नागरिक घडविण्यासाठी औपचारिक शिक्षणक्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते तसेच सामाजिक समतेच्या लढ्यात आघाडीवर असणारे अनेक साथी आजही आपल्या प्रेरणांचे श्रेय आदराने एस.एम. जोशी आणि राष्ट्र सेवा दलास देतात. हाती शिक्षणसंस्था, साखर कारखाना, मंत्रीपद असे काहीही नसताना एस.एम. यांना लाभलेली सर्वदूर मान्यता व आदर हे केवळ समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मुल्यांसाठी आयुष्यभर एस.एम. यांनी केलेला ध्येयवादी प्रवास यामुळेच.
सामाजिक समतेच्या आघाडीवर एस.एम. : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘आधी राजकीय सुधारणा की, आधी सामाजिक सुधारणा’ हा लो. टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील बहुचर्चित वाद आपणास माहित आहे. म. गांधीजींनी स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व करायला सुरुवात केल्याबरोबर हा वाद संपला, कारण गांधीजींनी हे द्वैतच संपवून टाकले. राजकीय स्वातंत्र्याची लढाई आणि सामाजिक समतेची लढाई साथोसाथच करायची असते, हे गांधीजींनी वैशिष्टपूर्ण कार्यक्रमांच्या रचनेतून दाखवून दिले. एस.एम. जोशी आणि बाकीचे समाजवादी नेते म. गांधीजींना आदर्श मानूनच स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते.
पुण्यात त्याकाळात पर्वतीचा सत्याग्रह गाजला होता. पर्वतीच्या टेकडीवरील मंदीरात शोषित जातीसमुहांच्या लोकांनाही प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या सत्याग्रहात एस.एम. जोशी आघाडीवर होते. या मागणीस पुण्यातील धर्मांध सनातन्यांचा विरोध होता. तो विरोध हिंसक होता. विरोधकांनी आंदोलकांची डोकी फोडली. एस.एम. यांना त्यांनी उचलून रस्त्याच्या बाजूच्या निवडुंगाच्या काटेरी फडामधे फेकून दिले होते. तरीही त्या लढ्यातील त्यांचा निर्धार कायम होता.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरात सर्व जातीधर्माच्या स्त्रीपुरुषांना प्रवेश मिळावा, यासाठी सानेगुरुजींनी आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. एस.एम. जोशी यांनी तात्काळ सानेगुरुजींची भेट घेऊन असे तडकाफडकी उपोषण करण्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेला सामाजिक समतेचा हा मुद्दा आधी समजावून सांगून मग उपोषण करणे ठीक राहील, असे सुचविले. सानेगुरुजींनी एस.एम. यांचे म्हणणे मान्य केले. मग वर्षभर सानेगुरुजी आणि राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाने विठ्ठल मंदीर प्रवेशाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रव्यापी प्रबोधन दौरा केला. त्यानंतर झालेले सानेगुरुजींचे उपोषण आंदोलन यशस्वी झाले व पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराचे दरवाजे सर्व जातीधर्माच्या स्त्रीपुरुषांना खुले झाले. सामाजिक समतेच्या लढ्यासोबत एस.एम. यांनी आयुष्यभर बांधिलकी जपली.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे नेते : मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य व्हावे, यासाठी जो दीर्घ संघर्ष करावा लागला त्याचे नेतृत्व एस.एम. जोशी यांनी केले. त्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीत भिन्न भिन्न विचारांचे अनेक पक्ष सामील होते. या सर्वांची मोट बांधून महाराष्ट्रीयन नागरिकांच्या एकीची वज्रमुठ उभारण्याचे अवघड काम एस.एम. सारखे नैतिक दबदबा असलेले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कसब असलेले, संवादी, समन्यायी व्यक्तीमत्वच करु शकते हे हेरुन समितीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी एस.एम.वर येऊन पडली होती. ती जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पेलली. हे करताना त्यांना सुरुवात तर स्वपक्षाच्या दिल्लीतील नेतृत्वालाच समजावून सांगून करावी लागली.
गुजराती भाषिक आणि मराठी भाषिकांचे एकत्रित असलेले द्वैभाषिक राज्य तोडून मराठी भाषिकांसाठीचा मुंबईसहित महाराष्ट्र आपल्याला हवा होता. एस.एम. जोशी यांनी घेतलेल्या भूमिका आणि दिलेले कार्यक्रम यांचे हे वैशिष्ट होते की, मराठी भाषिकांना मुंबईसह महाराष्ट्र राज्य तर मिळालेच परंतु आंदोलनाच्या काळात आणि नंतरही गुजराती भाषिकांच्याबद्दलचा द्वेष किंवा अविश्वास इथे निर्माण झाला नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीत एस.एम.च्या बरोबरीने इतर पक्षांचे अनेक दिग्गज नेते होते. त्या सर्वांच्या भरीव योगदानातून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. ते बनण्यासाठी या सर्व नेत्यांना तितक्याच ताकदीने साथ दिली होती कामगारांनी, शेतकऱ्यांनी आणि चाकरमान्यांनी.
जनतेच्या हितासाठी स्थानिक भाषेत राज्याचा कारभार चालावा, शेतकरी व कामगारांच्या घामाला न्याय देणारे निर्णय व्हावेत, फुले, शाहू, आंबेडकर यांनी दाखवलेल्या विवेकाच्या व सामाजिक न्यायाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल व्हावी ही संयुक्त महाराष्ट्र समितीची भूमिका होती. महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्षानंतरच्या वाटचालीत एस.एम. जोशींना अभिवादन करताना वरील उद्दिष्टांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य आज नेमके कोठे आहे? याबद्दल फार मोठे आत्मपरीक्षण आपल्या सर्वांना करण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात ‘समाजवादी भारतात, समाजवादी महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली जायची. आज आपली वाटचाल नेमकी उलट दिशेने दिसतेय. संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीच्या वेळची जनभावना पुन्हा एकदा आजच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे.
राजकारणातील संत : एस.एम. जोशी तत्कालीन समाजवादी पक्षात सातत्याने सक्रीय होते. त्यांनी पुण्याचे महापौरपद भुषविले तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्वही केले. ते कधी निवडणुका जिंकले तर कधी हरले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी तत्वांशी तडजोड मात्र त्यांनी कधीही केली नाही. आज निवडणुकीच्या राजकारणात कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. विचारांची बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह म्हणजे काय असतो, हे तरुणाईला समजावून सांगावे लागेल इतके आजुबाजुच्या राजकीय वातावरणात भ्रष्ट आचरण वाढले आहे. एस.एम. जोशी म्हणजे पारदर्शी आणि स्वच्छ राजकारणाचे दीपस्तंभ होते. ते राजकारणातील संत होते. जय किंवा पराजय सारख्याच निर्विकारपणे स्विकारणारे स्थितप्रज्ञ होते.
१९५२ सालच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’सोबत तत्कालीन समाजवादी पक्षाची युती झाली होती. एस.एम. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पण नेमके पुणे मतदारसंघात शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता. सामाजिक समतेच्या लढ्यात सतत सक्रीय असल्याने शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते एस.एम. जोशी यांना आपला माणूस मानत होते.
त्यांना एस.एम. अण्णांचा प्रचार करायचा होता. त्यावेळी एस.एम. अण्णांनी स्वतःच एका जाहीर सभेत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, तुमच्या पक्षाने ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्याचाच प्रचार करणे हे तुमचे नैतिक कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या निर्णयाला बांधील रहा. आज अनेकांना हे वागणे अनावश्यक आदर्शवादी किंवा भोळसट वाटेल पण निवडणूकीच्या राजकारणातून आदर्शवाद हळूहळू संपत गेलेला असताना आणि ‘निवडून येण्यासाठी वाट्टेल ते’ अशा प्रकारचा नंगा स्वार्थ तिथे बोकाळलेला असताना व त्यामुळेच भारतीय लोकशाही आजच्या धोकादायक वळणावर आलेली असताना एस.एम. जोशींच्या ध्येयवादी आणि पारदर्शी राजकारणाची तीव्रतेने आठवण येणे स्वाभाविक आहे.
यशस्वी कामगार नेते : एस.एम. जोशी एक यशस्वी कामगार नेते होतेच पण त्याचबरोबर ते एक जबाबदार कामगार नेते होते. कामगारांना सोबत घेऊन किमान वेतन, नियमीत पगारवाढ, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, कामगारांच्या भविष्याबद्दलची तरतूद असे अनेक मुद्दे ते लावून धरायचे. पण त्याचबरोबर कामगारांनी व्यसनांपासून लांब रहावे, आपले काम प्रामाणिकपणे करावे, उत्पादनवाढीसाठी नाविन्यपुर्ण प्रयोग करावेत, घरातील महिलांशी सन्मानाने व बरोबरीने वागावे याबाबत ते कामगारांशी सतत संवाद करायचे. भांड्यांच्या कारखान्यातील मजूरांपासून ते संरक्षण व दारुगोळा उत्पादन कारखान्यातील कामगारांपर्यंतच्या संघटना एस.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम करायच्या. एस.एम. च्या नैतिक अधिकाराचा आणि कामगारांच्या एकजुटीचा उपयोग कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी व्हायचा.
रचनात्मक संघर्षाचे प्रणेते : रचनात्मक संघर्ष हा शब्द महाराष्ट्राच्या समाजजीवनाला एस.एम. यांनी दिला. व्यवस्था न्याय देत नसेल तर शांततामय मार्गाने, सनदशीर मार्गाने जनमत संघटित करत सरकारची धोरणे बदलण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. अशा संघर्षाची गरज पडेल तेंव्हा कार्यकर्त्याने कुठल्याही परिस्थितीत माघार न घेता मैदानात उतरलं पाहिजे. पण त्याचबरोबर संवैधानिक मुल्यांच्या पाठीशी उभा रहाणारा समाज सततच्या कृतीशील प्रबोधनातून घडत असतो. असे कृतीशील प्रबोधन सातत्याने करत राहिले पाहिजे. त्याचबरोबर सरकारची चुकीची विकासप्रक्रिया योग्य दिशेला वळवायची असेल तर मग आपल्याला अपेक्षित विकासप्रक्रियेला सिद्ध करणारे रचनात्मक विकासाचे प्रयोग जनतेच्या सहभागातून उभे रहातील ही जबाबदारी पण कार्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे. समाजवादी कार्यकर्त्यांसाठी तुरुंग, फावडे आणि मतपेटी ही त्रिसुत्री डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दिली. त्याचाच एक वेगळा अविष्कार एस.एम. नी रचनात्मक संघर्ष या संकल्पनेतून दिला.
सानेगुरुजींच्या दुःखद निधनानंतर त्यांना आदरांजली वहाताना एस.एम. जोशी यांनी राष्ट्र सेवा दल सैनिकांना सेवा पथकाचा उपक्रम दिला. त्यानंतर अनेक वर्षे सेवा दल सैनिकांनी गावोगावी जाऊन, गावकऱ्यांच्या सोबतीने श्रमदान करत तलावातील गाळ काढणे, मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता बनवणे, झाडांसाठी खड्डे खोदून वृक्षारोपण करणे असे अनेक रचनात्मक कामे पुर्ण केली. महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तरुणाईने नंतर हाच कार्यक्रम स्विकारला, आपला मानला. राष्ट्र सेवा दलापासून प्रेरणा घेतलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी संस्थात्मक उभारणी करुन अनेक गावात ‘माथा ते पायथा’ (Ridge To Valley) या सुत्रानुसार पाणलोट क्षेत्रविकासाची आदर्श कामे उभी केली. हे सर्व कार्यकर्ते एस. एम. जोशी यांच्या रचनात्मक संघर्ष या संकल्पनेने प्रेरित झालेले होते. एसेम अण्णांना विनम्र अभिवादन.


