Press | नेपाळ पत्रकार महासंघाचा 71 वा वर्धापनदिन

3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

विश्ववार्ता | ३१.३ | प्रभाकर ढगे

(Press) नेपाळ पत्रकार महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष उदय जी.एम. हे २०२२ पासून माझे मित्र आहेत. नेपाळी पत्रकारितेतील घडामोडी ते सतत शेअर करत असतात. लुंबिनी राज्यातील बुटवल, नारायणगड, लमही, कोहलपूर, तुलसीपूर परिसरात फिरत असताना घोराही शहरात अचानक उदयची भेट झाली. याच शहरातील रहिवासी नेपाळचे तीन वेळा उपपंतप्रधान राहिलेले कृष्ण बहादूर महरा, यांची भेट उदयमुळेच होऊ शकली.

(Press) उदयच्या मोटरसायकलवरून घोराही शहरात फेरफटका मारता आला. डांग जिल्ह्यातील हे सर्वात मोठे शहर. तराईचा प्रदेश असलेला हा भाग जसा सुपीक जमीन आणि धान्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो नेते निर्माण करणाराही आहे. नेपाळमधील अनेक नामांकित नेते या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्यापैकी अनेकांच्या भेटी झाल्या. त्यातून येथील निवडणूक पूर्व मतदारांचा कल जाणून घेता आला.

(Press) नेपाळमधील श्रमिक पत्रकारांच्या समस्या काय आहेत, याबाबतीत उदयकडून बरीच माहिती मिळाली. १३ हजार सदस्य संख्या असलेल्या नेपाळ पत्रकार महासंघाने येथील पत्रकारांसाठी अनेक उपक्रम चालवलेले आहेत. तीन वर्षे सलग पत्रकारितेत असलेल्या कुठल्याही पत्रकाराला या महासंघाचे सदस्य होता येते. भारतासारखे इथल्या माध्यमात अजून गोदी पर्व सुरू झालेले नाही. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातील पत्रकारही बिनधास्तपणे सरकार विरोधात लिहितात, असा उदयचा दावा आहे.
रोजची वृत्तपत्रे चाळल्यावर त्याची प्रचिती येते. गंमत म्हणजे १८८६ साली ‘गोरखा भारत जीवन’ या नियतकालिकाच्या रूपाने झालेला नेपाळी पत्रकारितेचा प्रारंभ हा बनारस म्हणजे आजच्या वाराणसीतून झालेला आहे. रामकृष्ण वर्मा हे त्याचे संपादक होते. १९०१ साली नेपाळमध्ये ‘गोरखापत्र’ हे दैनिक नरदेव पांडे यांनी सुरू केले. ते आजही प्रसिद्ध होते. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ कलथून गेला आहे. पत्रकारितेचे पावित्र्य संपले आहे.
सत्ताधिशांच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालकांनी प्रसार माध्यमांचा पढीक पोपट करून टाकला आहे. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांचे रूपांतर एकतर्फी प्रचार यंत्रणेत झाले आहे. असा निराशेचा सार्वत्रिक सूर ऐकू येत असलेल्या काळात माध्यमांविषयी काहीच सकारात्मक घडत नाही, असे जर वाटत असेल तर आपण डिजिटल मीडियाच्या उदयानंतर उभ्या राहात असलेल्या भारत आणि नेपाळमधील पर्यायी माध्यमांकडे डोळेझाक करत आहोत असे म्हणावे लागेल.
उदयसारख्या किती तरी पत्रकारांनी दूरध्वनी ते भ्रमणध्वनी या वेगवान प्रवासात हाती आलेल्या स्मार्टफोन नावाच्या एका बहुउद्देशीय साधनाद्वारे चमत्कार घडवून आणला आहे. वेब मीडियाचा आवाका वाढत चालला असून, अनेक नवनव्या संधीची दारे उघडली जात आहेत. वेबपोर्टल, ॲप, साईट, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्ड इनसारखा सोशल मीडिया, यूट्युब चॅनल या आॕनलाईन माध्यमातून मेनस्ट्रीम मीडियाला धक्के बसायला सुरूवात झाली आहे. त्याचे सुखद प्रत्यंतर नेपाळमध्ये येते. कोविडनंतर भारताप्रमाणेच नेपाळमधील छापील वृत्तपत्रांच्या खपाचा दरारा ओसरला आहे. आमचा खप अमूक तमूक लाखऐवजी आता पेपरवाल्यांना सोशल मीडियावर फाॕलोअर्सचे आकडे सांगावे लागत आहेत.
श्रमिक पत्रकारावर कुठे अन्याय झाला तर नेपाळी पत्रकार महासंघ आवाज उठवतो. नेपाळमधील पत्रकारांना अद्याप निवृत्तीवेतन मिळत नाही. त्याविषयी आंदोलन चालू आहे. पेन्शन प्रस्ताव नव्याने सत्तेवर येणारे सरकार मान्य करील, असा उदयला विश्वास आहे. नेपाळमधील पत्रकारांचे पगार हे भारताप्रमाणेच शिक्षक- प्राध्यापकांच्या निवृत्तीवेतनाएवढे आहेत. तरीही पत्रकार खूश आहेत. अडथळे पार करून व्यवस्थेच्या विरोधात आपला आवाज बुलंद करत आहेत. आपली बिरादरी इथे स्वाभिमान टिकवून आहे, ही वार्ता सुखावून गेली. नेपाळ पत्रकार महासंघाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त शूभेच्छा.
Share This Article