नवी दिल्ली | १४.३ | रयत समाचार
(Press) प्रसारभारतीने माध्यम संस्थांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ‘PB-SHABD’ (Prasar Bharati – Shared Audio Visuals for Broadcast and Dissemination) ही सेवा मार्च २०२७ पर्यंत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे देशभरातील वृत्तसंस्था, टीव्ही चॅनेल, डिजिटल पोर्टल आणि प्रादेशिक माध्यमांना दर्जेदार बातमी साहित्य विनामूल्य मिळणार आहे. याबद्दल रयत समाचार वृत्तसमुहाने प्रसारभारतीचे आभार मानले.
(Press) PB-SHABD ही प्रसारभारतीची एक आधुनिक डिजिटल सेवा असून याद्वारे व्हिडिओ, ऑडिओ, मजकूर आणि छायाचित्रांसह विविध प्रकारचे वृत्तसाहित्य माध्यम संस्थांना उपलब्ध करून दिले जाते. या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणाऱ्या सामग्रीवर कोणतेही लोगो किंवा वॉटरमार्क नसतात, त्यामुळे मीडिया संस्थांना ही सामग्री सहजपणे वापरता येते.
(Press) प्रसारभारतीने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मसाठी देशभरातील १५०० पेक्षा अधिक पत्रकार आणि वार्ताहरांचे मजबूत नेटवर्क कार्यरत आहे. तसेच बातम्या तयार करून पाठवण्यासाठी ६० संपादन कक्ष (Editing Desks) दिवसरात्र कार्यरत आहेत.
या माध्यमातून दररोज कृषी, तंत्रज्ञान, राजकारण, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांसह विविध विषयांवरील १००० हून अधिक बातम्या अपलोड केल्या जातात. या सेवा भारताच्या प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रादेशिक माध्यमांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय राष्ट्रीय कार्यक्रम, पत्रकार परिषद आणि महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांचे लाइव्ह फीड देखील या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जातात. जुने फुटेज आणि विशेष पॅकेजेससाठी स्वतंत्र ‘आर्काइव्ह लायब्ररी’ देखील तयार करण्यात आली आहे, ज्यातून माध्यम संस्थांना आवश्यक व्हिडिओ व माहिती सहज मिळू शकते.
प्रसारभारतीच्या या निर्णयामुळे लहान आणि प्रादेशिक माध्यम संस्थांना दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्तसाहित्य मिळण्याचा मोठा मार्ग खुला झाला आहे, असे रयत समाचार वृत्तसमुहाने सांगितले.


