नवी दिल्ली | २.३ | रयत समाचार
(Rip news) ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, प्रख्यात प्राध्यापिका आणि महिला चळवळीतील कटिबद्ध नेत्या डॉ. गार्गी चक्रवर्ती यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रासह प्रगतिशील आणि लोकशाही चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
(Rip news) डॉ. चक्रवर्ती या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासक म्हणून देशभर परिचित होत्या. ‘Coming Out of Partition’, ‘Charting a New Path: Early Years of National Federation of Indian Women’ आणि ‘PC Joshi: A Biography’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासावर प्रकाश टाकला. कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास आणि महिलांच्या संघटनात्मक वाटचालीचा अभ्यास त्यांनी चिकित्सक दृष्टीकोनातून मांडला.
(Rip news) त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमनच्या (NFIW) कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेवर त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
त्यांच्या निधनाने अभ्यासक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांप्रती विविध स्तरांतून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. डॉ. गार्गी चक्रवर्ती यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
निधनाबद्दल स्मिता पानसरे म्हणाल्या, आमच्या प्रिय नेत्या अभ्यासू मार्गदर्शिका कॉ. डॉ. गार्गी चक्रवर्ती यांच्या निधनाची बातमी प्रचंड वेदनादाई, अत्यंत दु:खद. त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन (NFIW) यांच्या कार्याध्यक्ष होत्या आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) च्या आजीवन सदस्य होत्या. त्या पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यही होत्या. दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका आणि ‘मेनस्ट्रीम’चे संपादक सुमित चक्रवर्ती यांच्या पत्नी म्हणूनही त्या परिचित होत्या. सर्व जनआंदोलनांमध्ये त्या सतत सक्रिय सहभागी होत्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य पुरोगामी मार्क्सवादी विचारांशी अढळ बांधिलकी, संघर्ष आणि जनसेवेने प्रेरित होते. त्यांचे निधन हे NFIW साठी कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला व सहकाऱ्यांना हा मोठा आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच प्रार्थना.
