अहमदनगर | २५.२ | रयत समाचार
(Press) अहिल्यानगरमधील मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी ‘पत्रकार कट्टा’ या नव्या उपक्रमाची सुरुवात होत आहे. संवाद हरवत चाललेल्या पत्रकारितेला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने हा मंच उभारण्यात आला असून, दर महिन्याला एकत्र येत विविध विषयांवर मुक्त चर्चा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
(Press) पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार एकत्र आल्यानंतर प्रत्यक्ष भेटीगाठी आणि सखोल चर्चांचा अभाव जाणवत असल्याची भावना व्यक्त झाली होती. वर्तमानपत्र, चॅनेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे संपर्क असला तरी प्रत्यक्ष संवादासाठी वेळ मिळत नाही, असे मत अनेकांनी मांडले. त्यातूनच ‘पत्रकारांनी पत्रकारांसाठी’ हा उपक्रम राबवण्याचे ठरले.
(Press) या मंचावर कोणतेही औपचारिक पदाधिकारी किंवा शुल्क व्यवस्था नसणार आहे. हा पूर्णपणे अनौपचारिक, सर्वसमावेशक आणि व्यावसायिक संवादासाठीचा कट्टा असेल. दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी सकाळी ९.३० वाजता बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार विषयतज्ज्ञांनाही आमंत्रित केले जाईल.
पहिला कट्टा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सीएसआरडी येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार सतीश कुलकर्णी (केसरी, लोकसत्ता, सकाळमधील दीर्घकालीन पत्रकारिता) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘आपला व्यवसाय, आपली भाषा’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कट्ट्याचे अध्यक्षस्थान डॉ. सुरेश पठारे (संचालक, सीएसआरडी) भूषवणार आहेत.
पत्रकारांच्या वैचारिक समृद्धीसाठी, परस्पर संवादासाठी आणि नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सुरू होणाऱ्या ‘पत्रकार कट्टा’ला शहरातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
