अहमदनगर | ११.२ | रयत समाचार
(Politics) वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तनवादी विचारधारेने प्रेरित होऊन बाभुळगाव येथील प्रदीप ठोंबे आणि खांडका येथील सचिन ठोंबे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह पक्षात जाहीर प्रवेश केला.
(Politics) ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणावर विश्वास ठेवून झालेला हा प्रवेश आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
(Politics) पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नेते व सल्लागार जे.डी. शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
परिवर्तनाची मोठी ताकद – योगेश साठे
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी हा केवळ राजकीय पक्ष नसून तो परिवर्तनाची मोठी ताकद आहे. प्रदीप आणि सचिन ठोंबे यांच्यासारख्या सामाजिक जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाभुळगाव व खांडका परिसरात पक्ष अधिक सक्षम झाला आहे. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही अधिक आक्रमक भूमिका मांडणार आहोत.”
गावोगावी संघटन मजबूत करू – ठोंबे बंधू
प्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना प्रदीप व सचिन ठोंबे म्हणाले, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि बाळासाहेब आंबेडकरांचे खंबीर नेतृत्व हेच वंचित घटकांना न्याय देऊ शकते. या विचाराने प्रेरित होऊन आम्ही पक्षात प्रवेश केला आहे. आता गावोगावी जाऊन संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर, युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ, जिल्हा सदस्य फैरोज पठाण, विनायक गोरखे, देविदास भालेराव, संतोष पवार, कैलास पगारे, विजय मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
