मुंबई | १०.२ | रयत समाचार
(Women) आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी आज ता.१० फेब्रुवार रोजी केले. त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे ‘चाणक्य’ प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार उपस्थित होते.
(Women) महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) नेत्या आणि दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या नियुक्तीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
मुंबईतील मंत्रालयात त्यांनी आपल्या कार्यालयात प्रवेश करताच उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला प्रणाम करून आदर व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
(Women) सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
राज्यातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या नियुक्तीला मोठे महत्त्व दिले जात असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रशासनात नवा अध्याय चालू होईल.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
