शेवगाव | लक्ष्मण मडके
Ahmednagar news: वारकरी संप्रदायातील आदर्श कीर्तनकारांपैकी कृतीयुक्त परमार्थ करण्यात अग्रस्थानी असलेले शेवगावचे वारकरी भूषण, श्री जोग महाराज सेवा संस्थानचे संचालक ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के यांना यंदाचा ‘गोदावरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैठण येथील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार बुधवार, दि. २८ रोजी गोदावरी प्रकट दिन, गंगापूजन व दीपोत्सव सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
पैठण येथील बाहेरील नाथ मंदिरामागील कमलतीर्थ येथे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर, तहसीलदार ज्योती पवार, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, मुख्याधिकारी पल्लवी आंबोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष तुषार सूर्यभान पाटील यांनी दिली.
झिंजुर्के महाराजांनी वारकरी संप्रदायाची संस्कृती जोपासत हरिनामाचा गजर करीत आदर्श फडकरी कीर्तनपरंपरा जपली आहे. त्यांची जन्मभूमी आखेगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असली तरी त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील गंगाघाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिन्यातील प्रत्येक एकादशीला गंगाघाटावर नित्यनियमाने स्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला.

सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमातून शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर आतापर्यंत ३४ वेळेस गोदावरी वाळवंटांची स्वच्छता करण्यात आली असून ही सेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेमुळे गोदावरी नदीवरील तीर्थक्षेत्र असलेल्या गंगाघाट परिसराला स्वच्छतेचा मोठा लाभ झाला असून परिसराने जणू मोकळा श्वास घेतला आहे.
या कार्यात शेवगाव तालुक्यातील आखेगाव, सुसरे, हिंगणगाव, सोमठाणे, वरूर, भातकुडगाव, कोरडे वस्ती (शेवगाव), बेलगाव, बालमटाकळी यासह अनेक गावांतील वारकरी नियमित हजेरी लावत आहेत. एकादशीनिमित्त स्वच्छता सेवा मोहीम पूर्ण झाल्यानंतर कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद, फलाहार असा पवित्र उपासना सोहळाही पार पडतो.
गोदावरी स्वच्छतेसाठी झिंजुर्के महाराजांनी केलेल्या या उल्लेखनीय सामाजिक-आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘गोदावरी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याने वारकरी बांधवांतून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक