नगर तालुका |३०.११ | रयत समाचार
(Cultural Politics) सूक्ष्म निरीक्षण, चिंतन आणि समाजमनाचे आकलन यातून निर्माण होणाऱ्या साहित्यकृती समाजाला दिशा देतात. दर्जेदार साहित्याची निर्मिती आणि त्याचा सन्मान होणे ही अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक प्रक्रिया आहे. अक्षर साहित्य प्रतिष्ठान सद्गुरू साहेबराव आवारे यांच्या नावे पुरस्कार देऊन हीच भूमिका समर्थपणे निभावत आहे, असे प्रतिपादन विनोदी कथाकथनकार साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
(Cultural Politics) जेऊर बायजाबाई येथे सद्गुरू साहेबराव आवारे गुरुजींच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अक्षर साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धिनाथ मेटे तर प्रमुख उपस्थितीत प्रा.शशिकांत शिंदे, डॉ.संजय बोरुडे, प्रा.हेमलता पाटील, ॲड.विनायक तोडमल, नवनाथ मगर, संदीप शेटे, संतोष घोलप, सचिन चोभे आदी मान्यवर होते.
(Cultural Politics) पुढे डॉ.कळमकर म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी परंपरा ही केवळ धार्मिक परंपरा नसून मानवी जीवनाला उन्नत करणारे तत्त्वज्ञान आहे. आवारे गुरुजींचे साहित्यिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत आहे. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार ज्ञानपीठ व साहित्य अकादमी पुरस्कारांइतकाच मानाचा आहे. समाजात बोलके आणि कर्ते सुधारक दोन्ही असतात, त्यात आवारे गुरुजी हे कर्तृत्वाने सुधारणा करणारे व्यक्तिमत्त्व आहे.
सद्गुरू आवारे गुरुजी म्हणाले, साहित्य निर्मिती ही समाज घडवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे पुरस्कारार्थींनी आणखी जबाबदारीने लेखन करून साहित्याचा दर्जा वाढवावा. त्यांनी सर्व विजेत्यांच्या साहित्यकृतींचा उल्लेख करून मार्गदर्शन केले.
पुरस्कारार्थी ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, वारकरी धर्म हा माणसांना जोडणारा धागा आहे. महाराष्ट्रातील गावखेड्यांनी ही परंपरा जपली आहे. त्या परंपरेवरील माझ्या पुस्तकाचा अक्षर प्रतिष्ठानने सन्मान केल्याचा आनंद आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अशोक निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती पाटील व डॉ. सूर्यकांत वरकड यांनी तर आभार प्रदर्शन सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले.
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांतर्गत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, सोलापूर. वैचारिक साहित्य : होय, होय वारकरी. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कादंबरी : चिंबोरी युद्ध. सागर जाधव-जोपुळकर, नाशिक, काव्य : माती मागतेय पेनकिलर. शारदा घोडके, श्रीगोंदा, काव्य : अव्यक्ताचा चंद्र या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, ग्रंथ संच आणि रु. ५,०००/- रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. जुन्या साहित्यसंग्रहाचे संवर्धन करणारे संग्राहक शब्बीर शेख यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
