India news | ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीदर्शनाची अनोखी भेट; महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नवी दिल्ली | ०८.११ | रयत समाचार

(India news) नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात संध्याकाळी रंगलेले वातावरण काहीसे वेगळे आणि भावनिक होते. कारण, अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठान संचालित ‘सावली’ संस्थेतील २६ मुलांचे दिल्ली दर्शनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. मायेची ऊब हरवलेल्या या मुलांनी व्यक्त केलेली छोटीशी इच्छा, देशाची राजधानी पाहण्याची, सचिव तथा दिल्ली येथील निवासी आयुक्त श्रीमती आर. विमला यांच्या पुढाकारामुळे आणि दात्यांच्या सहकार्यामुळे साकार झाली.India news

(India news) अहिल्यानगर केडगाव येथील ‘सावली’ स्वयंसेवी संस्थेत आई-वडील नसलेल्या, विभक्त कुटुंबातील, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसह एकलपालक असलेल्या मुलांचे संगोपन केले जाते. काही दिवसांपूर्वी श्रीमती आर. विमला यांनी संस्थेला भेट दिली होती. या भेटीत मुलांनी आपली स्वप्ने, भावना मोकळेपणाने व्यक्त केली. त्यात देशाची राजधानी पहाण्याची इच्छा सुनावताच त्या भावूक झाल्या.

ही मुले त्यांच्या वेदनांकित पार्श्वभूमीमुळे माझ्या मनात घर करून होतीच. दिल्ली सहलीची त्यांची इच्छा ऐकताच मी हलून गेले. त्यांना राजधानी अनुभवायला देईन, असा शब्द श्रीमती विमला यांनी मुलांना दिला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला.

(India news) त्यांच्या पुढाकाराने व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ नोव्हेंबर रोजी ‘सावली’तील २६ मुले-मुली दिल्लीला दाखल झाली. या मुलांमध्ये ६-७ वर्षांच्या बालकांपासून ते महाविद्यालयीन तरुण-तरुणींपर्यंत सर्वांचा समावेश होता. मागील चार दिवसांत त्यांनी दिल्लीतील महत्त्वपूर्ण वास्तू, ऐतिहासिक स्थळे आणि विविध पर्यटन स्थळांना भेट देत अविस्मरणीय अनुभव घेतला.India news

सहलीचा समारोप महाराष्ट्र सदनातील छोटेखानी पण मनाला भिडणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. मुलांनी गाणी, नृत्य, मनोगते सादर केली. भावना, उत्साह आणि आनंदाने भरलेली त्यांची मने ओसंडून वाहत होती. मुलांचा हा उमलता आनंद पाहून उपस्थित अधिकारी व मान्यवर भावूक झाले.

मनोगत व्यक्त करताना सेजल जगताप म्हणाली, दिल्लीदर्शन माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. आम्ही पालकांविना आहोत, पण या देशाचे आहोत. आम्हाला मोठे होण्याचा पूर्ण हक्क आहे तर दुर्गा राजपूत म्हणाली, या सहलीत मिळालेला मायेचा स्पर्श मी आयुष्यभर जपेन. आता मला ठाऊक आहे, मी काहीही करू शकते!

कार्यक्रमात श्रीमती आर. विमला यांनी सर्व मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, तसेच संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे आणि महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ही संपूर्ण सहल केवळ पर्यटन नव्हे तर मायेचा, प्रेरणेचा आणि जीवनात मोठे स्वप्न पाहण्याच्या धैर्याचा अनमोल प्रवास होती.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article